बिबट बिनधास्त, अगदी दारापर्यंत... नागरिक दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 05:08 PM2022-07-02T17:08:00+5:302022-07-02T17:18:41+5:30
विद्यापीठ परिसरातील गिरमकर ले-आऊट येथे अंगावर शहारे आणणारा हा प्रकार घडला. यातून वन्यजीव-मनुष्य संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
मनीष तसरे
अमरावती : गुरुवारी रात्री जिवाच्या आकांताने कुत्री केकाटत होती. संभ्रांत परिसर असल्याने या इलाख्यात प्रत्येकाच्या घराला सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. त्यामधून बघतो तर काय, चोर नव्हे, तर चक्क बिबट्या कुंपण भिंतीवरून सहज उडी घेऊन अगदी दारापर्यंत आला होता. विद्यापीठ परिसरातील गिरमकर ले-आऊट येथे अंगावर शहारे आणणारा हा प्रकार घडला. यातून वन्यजीव-मनुष्य संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
गिरमकर ले-आऊट हा विद्यापीठाला खेटून असलेला परिसर आहे. या ठिकाणी अशा घटना वारंवार घडतात. या परिसरात बिबट्या केव्हाही दृष्टीस पडू शकतो. उन्हाळ्यात तर त्याला रोखण्यासाठी दरराेज फटाके फोडून बिबट्याला दूर ठेवण्याची कसरत या वस्तीत करावी लागते. घरी राहणारी मंडळी ही वृद्ध व घरी लहान मुले असल्याने बिबट्याची सतत भीती मनात कायम असते. त्याच कारणाने घराला सीसीटीव्हीची व्यवस्था या परिसरात करण्यात आली आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री दोनच्यासुमारास कुत्र्यांच्या भुंकण्याने प्रदीप चांदणे व त्यांची पत्नी हे जागे झाले. घरात चोर आले असावे, असे त्यांना वाटले. त्याच कारणाने ते आधी सीसीटीव्ही पाहायला गेले, तर त्यात त्यांना बिबट्या हा कुंपण भिंतीवरून जाताना दिसला. कुत्री जिवाच्या आकांताने ओरडत असल्याने त्याने पळ काढला. मात्र, काही वेळ तो विद्यापीठाच्या भिंतीवर जाऊन बसला. तेथून तो घराच्या दिशेेने पाहात होता. याआधी पंधरा दिवसांआधी दर्शन दिल्याचे प्रदीप चांदणे यांनी सांगितले.
झोपायच्या आधी दगड अन् फटाके
उन्हाळ्यात या परिसरात बऱ्याचदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. रात्री दहानंतर शांत झाल्यानंतर अनेकदा कुत्र्यांच्या ओरडण्यावरून बिबट्या असल्याचे जाणवते. त्या कारणाने मे महिन्यात बऱ्याचवेळा दगड व फटाके फोडून आवाज करावा लागत असे. मात्र, आज थेट दारापर्यंत बिबट्या आल्याने भीती, असुरक्षितता वाढली आहे.
तक्रारीनुसार वनविभागाच्या रेस्क्यू टीमने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. सीसीटीव्हीमध्ये गुरुवारी रात्रीच्यासुमारास चांदणे यांच्या घराच्या कुंपणभिंतीवरुन आत बिबट्याने प्रवेश केल्याचे दिसले. या ठिकाणी कुत्रे आणि जनावरांचा वावर असल्याने तो शिकारीकरिता आला असावा. या परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या अंधारात उशिरा फिरू नये, असे वारंवार वनविभागातर्फे आव्हान करण्यात आले आहे व सतर्क राहावे.
- सचिन नवरे, आरएफओ, वनविभाग, अमरावती