विद्यापीठात पुन्हा बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:18 PM2019-03-08T22:18:30+5:302019-03-08T22:20:11+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याचा संचार कायम आहे. आवडते भक्ष्य कुत्रे आणि तहान भागविण्यासाठी पाणी येथे उपलब्ध आहे. तलाव परिसरात जाणाऱ्या मार्गातील नाल्यातून बिबट्याची ये-जा सुरू असल्याचे सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्ष बघितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याचा संचार कायम आहे. आवडते भक्ष्य कुत्रे आणि तहान भागविण्यासाठी पाणी येथे उपलब्ध आहे. तलाव परिसरात जाणाऱ्या मार्गातील नाल्यातून बिबट्याची ये-जा सुरू असल्याचे सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्ष बघितले आहे.
विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या तलाव परिसरात बिबट्याने गाय फस्त केल्याची घटना २८ डिसेंबर २०१८ रोजी निदर्शनास आली होती. तेव्हापासून विद्यापीठ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे वारंवार पुढे येत आहे. मध्यतंरी बिबट्याने मुलींचे वसतिगृह, कुलगुरू बंगला, गेस्ट हाऊस या भागापर्यंत मजल गाठली होती. त्याचा वावर येथे वास्तव्यास असलेल्या मनुष्यांंसाठी धोकादायक होता.
दरम्यान, सुरक्षा रक्षकाला बिबट रस्ता ओलांडताना दिसून आला. त्यामुळे विद्यापीठात पहाटे भ्रमंतीस येणाऱ्यांना जंगल आणि तलाव परिसरासह अन्य काही भागात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली. त्याअनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने सतर्कतेच्या दृष्टीने जागोजागी धोक्याचा इशारा देणारे पोस्टरदेखील लावले. जानेवारी ते फेब्रुवारी असे दोन महिने बिबट्याचा मुक्त संचार ट्रॅप कॅमेºयात कैद झाला नाही. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बिबट नाल्यावाटे मुलींच्या वसतिगृह परिसरातून येत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी बघितले आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. या दिवसांत बिबट दिवसा झाडाझुडपात थंड ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचा अंदाज आहे. पाणी व शिकार अशा दोन्ही बाबी एकाच वेळी उपलब्ध होत असल्यामुळे बिबट्याने विद्यापीठ परिसरातच ठिय्या मांडला आहे.
जीवशास्त्र विभाग इमारतीच्या मागील बाजूस वास्तव्य
जीवशास्त्र विभाग इमारतींच्या मागील बाजूस झाडाझुडपात सध्या एका बिबट्याचा संचार आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी बिबट दिसून आला. येथील शेततळ्यावर मुबलक पाणी असून, तो कुत्र्यांची सहजतेने शिकार करीत असल्याची माहिती उपकुलसचिव (सुरक्षा) रवींद्र सयाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
भटकी कुत्री गेली कुठे?
विद्यापीठात कॅन्टीन, मुलामुलींचे वसतिगृह, कुलगुरू बंगला, गेस्ट हाऊस, मेस परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय होती. मात्र, काही दिवसांपासून भटक्या कु त्र्यांची संख्या अचानक रोडावली. बिबट कुत्र्यांची शिकार करतो. त्यामुळे कुत्र्यांची रोडावलेली संख्या बिबट्याच्या वास्तव्याला दुजोरा देत आहे.
विद्यापीठात बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेऱ्यांचे दैनंदिन निरीक्षण केले जात होते. मात्र, बिबट कैद झाला नसल्याने त्याने जंगलात प्रवेश केला असावा, असा अंदाज बांधला गेला. परिणामी ट्रॅप कॅमेरे काढण्यात आले. परंतु, बिबट विद्यापीठ परिसरात आला असेल, तर पुन्हा कॅमेरे बसविले जातील.
- कैलास भुंबर
वनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी