परतवाड्यात बिबट्याचा मृत्यू , ३७ दिवसांपासून सुरू होते उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 07:59 PM2020-06-01T19:59:35+5:302020-06-01T20:00:05+5:30
तीन दिवसांपासून बिबट तापाने फणफणत होता. ३० मे रोजी त्याच्या रक्ताचे नमुने परतवाड्यातील खासगी पॅथॅलॉजी लॅबमध्ये तपासले गेलेत. यात त्याचे श्वसनसंस्थेत बिघाडही आला होता. या फणफणत्या तापातच हा बिबट मृत्युमुखी पडला.
परतवाडा (अमरावती) : व्याघ्र प्रकल्पाच्या परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला चार वर्षीय नर बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३७ दिवसांपासून त्याच्यावर येथे उपचार सुरू होते. १ जून रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
तीन दिवसांपासून बिबट तापाने फणफणत होता. ३० मे रोजी त्याच्या रक्ताचे नमुने परतवाड्यातील खासगी पॅथॅलॉजी लॅबमध्ये तपासले गेलेत. यात त्याचे श्वसनसंस्थेत बिघाडही आला होता. या फणफणत्या तापातच हा बिबट मृत्युमुखी पडला. अचलपूर तालुक्यातील खैरी दोनोडा गावानजीक खैरी शिवारात अमरावती प्रादेशिक वनविभागांतर्गत परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचाºयांसह रेस्क्यू टीमने या बिबट्यास २५ एप्रिलला जेरबंद केले होते. या जेरबंद बिबट्याचा मागील पाय लोखंडी ट्रॅपमध्ये अडकला होता. यात त्याचे मागचे पायाला जखम झाली होती. या जखमी बिबट्याला २५ एप्रिललाच प्रादेशिक वनविभागाने परतवाड्यातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला दाखल केले. तेव्हापासून हा बिबट सिपना वन्यजीव विभागाच्या देखरेखीखाली होता. उपवनसंरक्षक शिवाबाला एस. व डॉ. अक्षय घटारे या बिबट्याच्या सरळ संपर्कात होते. पहिले तीन दिवस या बिबट्याने आहार घेतलाच नव्हता. चिकन टाकले असता त्याने खाल्ले नव्हते. नंतर बोकडाचे मांस त्याला दिले गेले. गोरेवाडा (नागपूर) स्थित विभागीय व्यवस्थापक वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात या बिबट्याचे दोन वेळा रक्त नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. यात लिव्हरची समस्या पुढे आली होती.
दरम्यान, बिबट्याच्या पायाच्या जखमेवर खपली धरली होती. पायावर तो उभाही राहत होता. दहा-बारा दिवसांपूर्वीच ‘स्क्वीज केज’मधून त्याला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडायला हवे होते. पण, सुकलेल्या जखमेवर केस येऊ द्या, मग सोडू, या विचारात त्याला स्क्वीज केजमध्येच अडकवून ठेवले गेले. मृत्यूपूर्वी त्याने आहार घेणे कमी केले अन् फणफणत्या तापात प्राण सोडले.
बिबट्याच्या शवविच्छेदनानंतर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या बाजूलाच त्याच्यावर अंतिम संस्कार केले गेले. अंत्यसंस्काराला उपवनसंरक्षक शिवाबाला एस., उपवनसंरक्षक अविनाश कुमार व पीयूषा जगताप, सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, विशाल बन्सोड, डॉ. अक्षय घटारे यांच्यासह वनरक्षक, वनपाल उपस्थित होते. अचलपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एम. कावरे आणि डॉ. कलोरे यांनी शवविच्छेदन केले.
ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरवर उपचारादरम्यान बिबट्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्याला ताप आला. या तापातच तो मरण पावला.
- शिवाबाला एस., उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा.