पोहरा शिवारात बिबट्याच्या पाऊलखुणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:14+5:302021-07-03T04:10:14+5:30
बिबट शेतात, ग्रामस्थ गावात, ताज्या पाऊलखुणांनी जाहीर केले अस्तित्व पोहरा बंदी : शुक्रवारी भानखेडा ते पोहरा मार्गावरील शेतात ...
बिबट शेतात, ग्रामस्थ गावात, ताज्या पाऊलखुणांनी जाहीर केले अस्तित्व
पोहरा बंदी : शुक्रवारी भानखेडा ते पोहरा मार्गावरील शेतात आढळलेल्या ताज्या पाऊलखुणांनी बिबट्याचे अस्तित्व असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे पेरणी पश्चात मशागतीला मजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात पहिल्यांदाच बिबट्या शिवारात आढळल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
शुक्रवारी पोहरा येथील शेतमालक उपसरपंच हारुण शाह शेतात गेले असता, त्यांना त्यांच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ताजे ठसे आढळून आले. यावरून पावसाळ्यातही शिवारात बिबट्याचा वावर असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात बिबट गावानजीकच्या शेती शिवारात शिकारीच्या शोधात येत असल्याचे बिबट्याच्या पाऊलखुणांवरुन स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यात रोही, रानडुक्कर, काळवीट, हरीण, निलगाय या वन्यप्राण्यांचा कळप शेतीतील पिकांकडे आकृष्ट होतात. शेतशिवारात शिरकाव करून पिकांची नासाडी करतात. त्या मागील त्यांची शिकार करण्याकरिता पाठलाग करीत शेत शिवारापर्यंत बिबट्याने मजल गाठली आहे. पोहरा, चिरोडी, भानखेडा, कस्तुरा, सावंगा, लालखेड, हातला, इंदला, बोडना, कारला, घातखेडा, पिंपळखुटा ही गावे जंगलालगत आहे. त्यामुळे गावानजीकच्या शेती शिवारात बिबट्या पाऊलखुणा आढळून आल्याच्या घटनेने शेतकरी, शेतमजूर भयभीत झाले आहे.