'त्या' बिबट्याने चिकन कोंबडी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 03:21 PM2020-04-27T15:21:58+5:302020-04-27T15:23:53+5:30
अचलपूर तालुक्यातील खैरी शिवारात जेरबंद केल्या गेलेल्या बिबट्याने दवाखान्यात जेवण नाकारले आहे. भोजनात त्याला दिले गेलेल्या एक किलो चिकनकडे त्याने बघितलेही नाही. चिकन आवडले नसावे म्हणून त्याला जिवंत कोंबडी दिली गेली. पण, या जिवंत कोंबडीलाही त्याने चिडून ठार केले अन् तसेच सोडून दिले.
अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील खैरी शिवारात जेरबंद केल्या गेलेल्या बिबट्याने दवाखान्यात जेवण नाकारले आहे. भोजनात त्याला दिले गेलेल्या एक किलो चिकनकडे त्याने बघितलेही नाही. चिकन आवडले नसावे म्हणून त्याला जिवंत कोंबडी दिली गेली. पण, या जिवंत कोंबडीलाही त्याने चिडून ठार केले अन् तसेच सोडून दिले.
खैरी शिवारातून २५ एप्रिलला दुपारनंतर जेरबंद करून बिबट्याला परतवाडा येथील वाघाच्या दवाखान्यात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल केले गेले. तेथे त्यावर स्क्वीज केजमध्ये उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिलला भोजनात परत त्याला जिवंत कोंबडी दिली गेली. पण, वृत्त लिहिस्तोवर दुसºया दिवशीही त्याने भोजन ग्रहण केले नव्हते.
बिबट्याच्या मागच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. वेदना दूर करण्याकरिता त्याला वेदनाशामक आणि अँटिबायोटिक दिले जात आहे. त्याच्यावर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घटारे, अमरावती येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज आडे व डॉ. नैनेश कथले औषधोपचार करीत आहेत.
यापूर्वी खैरी शिवारात या बिबट्यावर डॉ. गजानन महल्ले आणि डॉ. मिलिंद काळे यांनी औषधोपचार केले. त्याच्या पायाचा एक्स-रे काढण्यात येणार आहे. त्याला नागपूरला हलविले जाणार आहे. ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमध्ये ज्या स्क्वीज केजमध्ये त्यावर उपचार सुरू आहेत, त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवली जात आहे. कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्या लोखंडी ट्रॅपमध्ये हा बिबट अडकला, त्याची बनावट वाघाची शिकार करणाऱ्या मध्यप्रदेशातील कटनी येथील बहेलिया गँगकडून वापरल्या गेलेल्या ट्रॅपसारखी आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. पण, खैरी शिवारात आढळलेला हा ट्रॅप कटनी ट्रॅपपेक्षा वजनाने हलका आहे. हरिण किंवा काळवीट पकडण्याकरिता हा ट्रॅप लावला असावा, पण चुकून त्यात बिबट अडकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुरक्षा वाढवली
ज्या ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमध्ये बिबट्याला ठेवले आहे, त्या परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. २४ तास वनकर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आल्या आहेत. वेळप्रसंगी पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.
ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमध्ये बिबट्याची काळजी घेतली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आॅब्झर्र्व्हेशनमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
- डॉ. शिवबाला एस.
उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग