महादेवखोरी भागात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:00 AM2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:01:23+5:30
महादेव खोरी परिसरात प्रभू येशू प्रार्थना स्थळ आहे. या प्रार्थना स्थळावर ये-जा करण्याऱ्यांची सतत वर्दळ राहते. याच स्थळापासून हाकेच्या अंतरावर वनक्षेत्र सुरू होते. महादेवखोरी परिसराच्या मागील बाजूस निसर्ग टेकड्या आहेत. जंगलाचा भाग असल्याने येथे वन्यजीवांचा संचार नित्याचीच बाब असल्याची माहिती वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने दिली. काही दिवसांपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यामुळे परिसरातील नागरिक पहाटे व सायंकाळी पायदळ भ्रमंतीसाठी जंगलाच्या दिशेने सीमा ओलांडून जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रीय महामार्ग वळण रस्त्यालगत असलेल्या महादेवखोरी भागात शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बिबट दिसून आला. त्यामुळे सायंकाळी पायदळ भ्रमंती करणाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान, वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने सुद्धा महादेव खोरी परिसर पिंजून काढला. मात्र, तोपर्यंत बिबट जंगलाच्या दिशेने निघून गेला होता, असे प्रत्यक्षदर्शनींचे म्हणने आहे.
महादेव खोरी परिसरात प्रभू येशू प्रार्थना स्थळ आहे. या प्रार्थना स्थळावर ये-जा करण्याऱ्यांची सतत वर्दळ राहते. याच स्थळापासून हाकेच्या अंतरावर वनक्षेत्र सुरू होते. महादेवखोरी परिसराच्या मागील बाजूस निसर्ग टेकड्या आहेत. जंगलाचा भाग असल्याने येथे वन्यजीवांचा संचार नित्याचीच बाब असल्याची माहिती वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने दिली. काही दिवसांपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यामुळे परिसरातील नागरिक पहाटे व सायंकाळी पायदळ भ्रमंतीसाठी जंगलाच्या दिशेने सीमा ओलांडून जातात. ही बाब वन्यजीवांच्या संरक्षणासाठी धोकादायक ठरणारी आहे. शनिवारी बिबट पाण्याच्या शोधात आला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाचे वनपाल शेख सलिम यांना महादेवखोरी भागात बिबट शिरल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक पोहोचले असता बिबट दिसून आला नाही. शहरालगतच्या वनक्षेत्रात अलिकडे बिबट्याची संख्या वाढीस लागल्याने ते शिकार शोधण्यासाठी नागरी वस्त्याकडे धाव घेत असल्याचे यापूर्वी दिसून आले.
महादेव खोरी जंगल भागात गस्त वाढविली
महादेव खोरी भागापासून वनक्षेत्र सुरू होते. या भागात नवीन नागरी वसाहत असल्याने काही जण भ्रमंतीसाठी लांबपर्यंत जंगलात ये-जा करतात. या भागात वन्यजीव असून, ते आपल्या संरक्षणासाठी नागरिकांवर हल्ला करू शकतात, ही भीती बळावली आहे. त्यामुळे वनविभागाने महादेव खोरी परिसरातील जंगल क्षेत्रात वनकर्मचाºयांनी गस्त वाढविली आहे. जंगल सीमत नागरीक प्रवेश करणार नाही, याची दक्षता वनकर्मचारी घेत असल्याची माहिती आहे.
परिसरात अन्य वन्यजीवांचेही वास्तव्य
महादेव खोरी भागात जंगल क्षेत्र असून, येथे बिबट्यांसह अन्य वन्यजीवांचे वास्तव्य आहे. जंगल क्षेत्रात वन्यजीव मुक्त संचार करीत असल्याने ते पाण्याच्या शोधात येऊ शकतात. त्यामुळे भ्रमंतीसाठी जाणाºया नागरिकांनी वनक्षेत्राच्या सीमेत प्रवेश करू नये, असे आवाहन वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांनी केले आहे.