अमरावती-परतवाड्यात बिबट, जरुडात वाघाने फोडली डरकाळी; नागरिकांमध्ये भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 12:38 PM2023-10-19T12:38:30+5:302023-10-19T12:43:59+5:30
वनविभागाचे सर्चिंग, शेतकरी, शेतमजूर शिवारात फिरकेना
जरूड (अमरावती) : गावालगतच्या सुधीर देशमुख यांच्या शेतात वाघ दृष्टीस पडल्याच्या चर्चेने नागरिकांची भीतीने गाळण उडाली आहे. वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.
जरूड-ईसंब्री रोडवरील एका बारमध्ये काम करणारे रूपेश सुहागपुरे यांना मंगळवारी रात्री १० च्या सुमारास डरकाळीचा स्पष्ट आवाज ऐकू आल्याने टॉर्च घेऊन त्यांनी शेतात अवलोकन केले असता, अवघ्या काही फूट अंतरावर त्यांना वाघ दिसला. त्यांनी कशीबशी तेथून सुटका करून घेतली. तत्पूर्वी, शनिवारी शेंदूरजनाघाट येथील माधव बानाईत या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शुक्रवारी एक अस्वल रेल्वे अपघातात दगावल्याने तिची सोबतीण परिसर पालथा घालत आहे. या भागातील वीजपुरवठा पाहता शेतकरी रात्री ११:३० नंतरच पिकांना ओलित करण्यासाठी शेतात जातात. त्यांच्यात दहशत पाहायला मिळत आहे.
भरवस्तीत दिसला बिबट, सीसीटीव्हीत बंदिस्त
अमरावती शहराची मुख्य वस्तीत असलेल्या पाठ्यपुस्तक महामंडळाच्या भांडार विभागाच्या मागच्या बाजूला मंगळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास काहींना बिबट भिंतीवरून उडी घेत असल्याचे दिसून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आधीसुद्धा बिबट याच परिसरात आढळून आला होता.
मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने त्याचा वावर याच परिसरात असल्याचे आता स्पष्ट झाले. सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत महिलांची वर्दळ असते. मात्र, ऐन संध्याकाळी ७ च्या सुमारास बिबट नजरेस आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात राहणाऱ्या अनेकांना मागील महिन्यातसुद्धा बिबट पहायला मिळाला होता, बिबट हा परिसरातील श्वानांची शिकार करण्यासाठी रात्रीच्या वेळी या परिसरात येतो. अनेक श्वान कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
मंगळवारी संध्याकाळी सात वाजून ५२ मिनिटांनी तो पाठ्यपुस्तक मंडळाच्या परिसरात आला. त्याने मांजरीचा पाठलाग केला आणि सात वाजून ५४ मिनिटांनी परत गेल्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. तेथील कर्माचाऱ्यांनी सीसीटीव्ही तपासून पाहिले असता, त्यात त्याचा वावर आढळून आला. पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रात रात्रपाळीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात असतात, हे विशेष.
मंगळवारी सायंकाळी बिबट परिसरात आल्याचे कळताच सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यात तो एका मांजरीच्या मागे लागल्याचे स्पष्ट दिसत होते. आमच्याकडून आम्ही बिबट्याचा बंदोबस्त लावण्याकरिता पत्र दिले आहे. रात्रपाळीकरिता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे, तसेच हातात काठ्या घेऊन राहण्याचे आदेश दिले आहेत.
- अनिल गौरखेडे, सहायक भांडार व्यवस्थापक, पाठ्यपुस्तक विभाग.
बिबट्याची बहिरम मंदिराला प्रदक्षिणा, जीव मुठीत धरून मजुरांनी रात्र काढली
परतवाडा : बहिरम मंदिरात परत एकदा दमदार एन्ट्री घेत बिबट्याने मंदिराला चक्क प्रदक्षिणा घातली. १७ ऑक्टोबरला रात्री १० च्या सुमारास हा बिबट मंदिरावर दाखल झाला. त्याच्या दमदार एन्ट्रीची चाहूल लागताच मंदिर परिसरातील लालतोंड्या माकडांनी एकच आक्रोश केला. आक्रोशामुळे मंदिरावरील चौकीदार सतर्क झाले. तेव्हा त्यांना बिबट मंदिराची प्रदक्षिणा आटोपती घेत, फेरफटका मारीत, बहिरमबाबा मंदिराच्या पायऱ्या उतरत तो जंगलाच्या दिशेने जाताना दिसला.
यापूर्वी २ ऑगस्टला बिबट बहिरम मंदिरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. बहिरम मंदिरावर बिबट आतापर्यंत चार वेळा येऊन गेला आहे. बहिरम यात्रा परिसर आणि लगतच्या शेतशिवारात ११ वेळा या बिबट्याने लोकांना दर्शन दिले. आश्रमशाळेपर्यंत बिबट पोहोचला आहे. गवळी बांधवांच्या गाई म्हशींना त्याने ओरबडले असून अनेक कुत्र्यांची शिकार केली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके यांनी दिली.
दिवाळीपूर्वीच फटाके
बिबट्यापासून बचाव करण्याकरिता मागील तीन दिवसांपासून बहिरम यात्रा परिसरात फटाके फोडले जात आहेत. दिवसा आणि रात्री अधूनमधून ते फोडले जातात. मंदिर परिसरात वनविभागाच्या सौजन्याने दाखल लालतोंड्या माकडांना आवर घालण्याकरिता अधूनमधून बहिरम मंदिरावर फोडले जाणारे फटाके आता बिबट्याकरिताही फोडले जात आहेत. मंदिरावरील फटाक्यांसोबतच सीताफळाच्या बनातही फटाके फोडले जात आहेत. फटाके फोडून मजूर सीताफळ बनाची राखण आणि स्वतःचा बचाव करीत आहेत.
रात्र काढली जागून
सीताफळ बन लिलावात घेणाऱ्यांनी त्याच्या राखणीकरिता मजूर लावले आहेत. बिबट्यामुळे या मजुरांचा जीव धोक्यात आला आहे. १७ ऑक्टोबरची रात्र त्यांना जीव मुठीत धरून एकमेकांच्या सहाऱ्याने जागून काढावी लागली.
बहिरम यात्रा परिसरात गत अडीच महिन्यांपासून दहशत पसरविणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा.
- ईश्वर सातंगे, विस्तार अधिकारी, चांदूर बाजार.