विद्यापीठात कुलगुरू बंगल्याच्या परिसरात बिबट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:41 PM2019-01-23T22:41:19+5:302019-01-23T22:41:35+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कुलगुरू बंगल्याच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास बिबट आल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कुलगुरू बंगल्याच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास बिबट आल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे बिबट हा विद्यापीठ परिसरातच दडून असल्याचे स्पष्ट होते. मध्यरात्री तो कुत्र्यांची शिकार करण्यासाठी बाहेर पडला असावा, असा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सोमवारी अमरावतीत अर्थसंकल्पीय नियोजन आढावा घेण्यासाठी आले असता, काही सुजाण नागरिकांनी त्यांची भेट घेऊन विद्यापीठ परिसरातील बिबट्याचा मुक्त संचार रोखण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने मुनगंटीवार यांनी अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मंगळवारी वनविभागाची चमू विद्यापीठात दाखल झाली. या चमूने बिबट्याचे संचार मार्ग बघितले. त्यानंतर वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांनी संचार मार्गावर अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे बसविले. बुधवारी रात्री १ वाजता कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या बंगल्याच्या परिसरातील ट्रॅप कॅमेºयात बिबट कैद झाल्याचे वनविभागाने सांगितले. हा बंगला मुलींच्या वसतिगृहालगत आहे. बाजूला दाट हिरवळ आहे. विद्यापीठ परिसरात दोन बिबट आहेत. मोर, माकडं वा कुत्र्यांच्या शिकारीसाठी बिबट येत असल्याचे वास्तव आहे. यामुळे सुरक्षा रक्षक धास्तावले आहेत. बिबट्याचा मुक्त संचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे पत्र वनविभागाला दिल्याची माहिती सहायक कुलसचिव (सुरक्षा विभाग) रवींद्र सयाम यांनी ‘लोकमत’ला दिली.
दरम्यान, विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृह परिसरातच सतत बिबट्याचा संचार निदर्शनास येत असल्याने विद्यार्थिनींमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. सायंकाळी ६ ते ७ वाजताच वसतिगृह परिसर निर्मुनष्य होतो. मुलींना सायंकाळचे जेवण करावयास मेसमध्ये जाताना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.
विद्यापीठात बिबट्याचा संचार असल्याचे सर्वश्रुत आहे. अगोदर काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. बुधवारी अतिरिक्त पाच ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. याद्वारे बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. बिबट जेरबंद करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला जाईल.
- कै लास भुंबर
वनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी