अंजनगावात भोंग्याचा गोंगाट कमी; जिल्ह्यात शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 05:00 AM2022-05-06T05:00:00+5:302022-05-06T05:00:56+5:30
बुधवारी सायंकाळी ७ वाजता काही मनसे कार्यकर्ते हनुमान चौकातील मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार असल्याची माहिती चांदूर बाजार पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच ठाणेदार सुनील किनगे यांनी मौलवींसोबत झालेल्या निर्णयाची माहिती मनसे कार्यकर्त्यांना दिली. यानंतर हनुमान मंदिरात चालिसा पठण झाले नाही. केवळ सायंकाळची दैनंदिन आरती पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार/वनोजा बाग : भोंग्यामुळे राज्यस्तरावर उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुर्जी शहरातील मशिदींमध्ये गुरुवारी सकाळी लाऊड स्पीकरवरून अजान बंद करून नमाज अदा करण्यात आली. चांदूर बाजारसह जिल्हाभरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर हाच कित्ता गिरवित सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून दिला.
अंजनगावात बुधवारी सायंकाळी यासंबंधी झालेल्या सभेत पोलिसांनी शांततेचे आवाहन करीत न्यायालयाच्या निर्देशांबाबत माहिती दिली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे व अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. याप्रसंगी काजी अब्दुल कलीम, नजीर अहमद, मौलवी शेख हुसैन, काजी अब्दुल शकील, मोहम्मद मोहसिन, पप्पू भाई, आरिफ टेलर, अजहरुद्दीन, अब्दुल लतीफ आदी उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी गुरुवारी सकाळी ५ ची अजान बंद केली. दुपारीदेखील कमी आवाजात लाऊड स्पीकरवर अजान घेतली. दोन्ही समुदायाच्या संयत भूमिकेमुळे प्रक्षोभक घटनेची नोंद झाली नाही.
चांदूर बाजार शहरात गुरुवारी सकाळी ६ ची नमाज भोंग्याविना झाली. शहरातील मशिदींच्या मौलवींसोबत ठाणेदार सुनील किनगे यांनी बुधवारी सायंकाळी बैठक घेतली.
हनुमान चालिसाचे पठण झालेच नाही
बुधवारी सायंकाळी ७ वाजता काही मनसे कार्यकर्ते हनुमान चौकातील मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार असल्याची माहिती चांदूर बाजार पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच ठाणेदार सुनील किनगे यांनी मौलवींसोबत झालेल्या निर्णयाची माहिती मनसे कार्यकर्त्यांना दिली. यानंतर हनुमान मंदिरात चालिसा पठण झाले नाही. केवळ सायंकाळची दैनंदिन आरती पार पडली.
जुळ्या शहरात पहाटेची नमाज शांततेत
परतवाडा : अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांसह चिखलदरा तालुक्यात गुरुवारी सकाळची नमाज भोंगा न वाजता झाली, असा पोलिसांचा अहवाल आहे. अचलपूर, परतवाडा व सरमसपुरा ठाण्याच्या हद्दीत ७१, तर चिखलदऱ्यात तीन मशिदी आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मशिदींच्या मौलवींची समन्वय बैठक घेण्यात आली. यात न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंग्याविना नमाज अदा करण्याचा निर्णय पुढे आला. नागरिकांचा सुयोग्य प्रतिसाद आहे.
- सुनील किनगे,
ठाणेदार, चांदूर बाजार