‘त्या’ कुख्यात गुंडाच्या अंत्ययात्रेकडे समाजबांधवांची पाठ
By admin | Published: April 21, 2017 12:13 AM2017-04-21T00:13:50+5:302017-04-21T00:13:50+5:30
येथील कुख्यात गुंड अशोक गजभिये ऊर्फ खांडेराव याची बडनेरा शहरात दहशत होती. हत्या, बलात्कार, विनयभंग तसेच खंडणी यांसह इतरही गंभीर गुन्हे
आरोपींना दोन दिवसांचा पीसीआर : भाचीने नोंदविली तक्रार
बडनेरा : येथील कुख्यात गुंड अशोक गजभिये ऊर्फ खांडेराव याची बडनेरा शहरात दहशत होती. हत्या, बलात्कार, विनयभंग तसेच खंडणी यांसह इतरही गंभीर गुन्हे त्याच्यावर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यापूर्वी देखील दोनदा त्याचा ‘अक्कू यादव’ करण्याचा प्रयत्न झाला असताना समयसुचकता राखून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, यावेळी तो वाचू शकला नाही. विशेष म्हणजे गुरूवारी त्यांच्या अंत्यसंस्कारात अगदीच नगण्य समाजबांधव सहभागी झाले होते.
अशोक गजभिये हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अशोक गजभिये हा ९ मार्च २०१७ पासून न्यायालयीन कोठडीत होता. मंगळवार १८ रोजी तो जामिनावर घरी आला होता. त्याच रात्री त्याचा खून करण्यात आला. अशोक गजभिये याची बडनेरा शहरात दहशत होती. त्याच्यावर बलात्काराच्या गुन्ह्यासह विनयभंगाचे चार गुन्हे दाखल होते. एका विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याला शिक्षादेखील झाली असून तो तडीपारसुद्धा होता. दरोड्याचा प्रयत्न, अश्लील वर्तणूक, जातीय दंगा घडविण्याचे गुन्हे, खंडणी मागणे, शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्यांची पोलीस खात्यात नोंद आहे. सन २०१४ मध्ये त्याने बडनेरा पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीवर कार्यरत महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली होती.
घटनेतील दगड जप्त
बडनेरा : पोलिसांवर दबावतंत्राचा वापर, व्यापाऱ्यांना धमकावून पैशांची वसुली अधिकाऱ्यांना दमदाटी करणे आदी प्रकारांमुळे अशोक गजभिये याने बडनेरा शहरात दहशत निर्माण केली होती. सन २००६ मध्ये त्याने महिलेचा विनयभंग केल्याने जयहिंद चौकात काही महीलांनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर सन २०१४ मध्येदेखील होलीक्रॉस मार्गावर महिला व पुरूषांनी त्याला सामूहिक चोप दिला होता. यादोन्ही घटनांनंतर तो पळून गेला. अशोकची दहशत संपविण्यासाठी त्याचा अक्कू यादव करण्याचा प्रयत्न दोनदा झाला. अशोक गजभिये याच्या हत्येप्रकरणी हिरामण रामजी रोकडे व संतोष सुधाकर परताडे यांना पोलिसांनी बुधवार १९ रोजी न्यायालयासमोर हजर केले होते. यादोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मारहाणीतील दगड जप्त केला आहे. अशोक गजभिये याच्या तीन नातेवाईकांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मेहेत्रे करीत आहेत. याप्रकरणात अद्याप पोलिसांनी केवळ दोन आरोपींना अटक केली आहे.