शाळेतच मिळणार आता निवडणूक प्रक्रियेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 07:23 PM2018-04-26T19:23:11+5:302018-04-26T19:23:23+5:30

तरुण मतदारांच्या संख्येत वाढ व्हावी, मतदान प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढावा याकरिता निवडणूक आयोगाने आता शालेय विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

Lessons of the election process will now be available in the school | शाळेतच मिळणार आता निवडणूक प्रक्रियेचे धडे

शाळेतच मिळणार आता निवडणूक प्रक्रियेचे धडे

Next
ठळक मुद्देआठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक साक्षरता क्लब

जितेंद्र दखने
अमरावती : तरुण मतदारांच्या संख्येत वाढ व्हावी, मतदान प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढावा याकरिता निवडणूक आयोगाने आता शालेय विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मतदार होण्यापूर्वीच दोन-तीन वर्षांपासून त्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी शाळांमध्ये ‘इलेक्शन लिटरसी क्लब’ स्थापन करण्यात येणार आहे.
नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यानुसार महाविद्यालयातच प्रवेशासोबत मतदार अर्जही भरून घेतला जात आहे. मात्र मतदार झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढावा, याकरिता शालेय वयातच त्यांना निवडणूक विषयक माहिती देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार आठवी ते बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली जाईल. यामुळे नवमतदार म्हणून वयाच्या १८ व्या वर्षी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांचा निवडणूक प्रक्रियेतील मतदार म्हणून सहभाग अधिक सक्षम होईल, असा विश्वास निवडणूक विभागाला आहे. त्यामुळे हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

शाळा सोडलेल्यांसाठी निवडणूक शाळा
ज्या विद्यार्थ्यांनी नववीनंतर शाळा सोडली, अशांसाठी किंवा दुर्गम भागात जेथे शाळा पोहचलेल्या नाहीत, अशा ठिकाणी बीएलओ यांच्या मार्गदर्शनात निवडणूक शाळा सुरू करण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वाड्या-वस्त्यांवर अशी शाळा भरवली जाणार आहे. यामध्ये संबंधित विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देऊन त्यांचाही मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे. या उपक्रमाला प्रतिसाद मिळाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा, महाविद्यालयात इलेक्शन लिटरसी क्लब स्थापन करण्यात येणार आहे. तेथील मुख्याध्यापक अथवा शिक्षक हे नोडल अधिकारी म्हणून राहणार आहेत. विद्यार्थ्यांचाही त्यात सहभाग राहील.नियंत्रण अधिकारी म्हणून एसडीओ राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रियेबाबतच्या कामाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली जाईल.
- नीता लबडे, सहायक निवडणूक अधिकारी, अमरावती

Web Title: Lessons of the election process will now be available in the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.