बांधावर खतपुरवठा योजनला शेतकऱ्यांची पाठ
By Admin | Published: July 5, 2014 11:20 PM2014-07-05T23:20:40+5:302014-07-05T23:20:40+5:30
राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २०१२ मध्ये सुरू केलेल्या बांधावर खतपुरवठा योजनेला जिल्ह्यात उतरती कळा आली आहे. मागील दोन वर्षांपासून या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसादच दिला नाही.
अमरावती : राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २०१२ मध्ये सुरू केलेल्या बांधावर खतपुरवठा योजनेला जिल्ह्यात उतरती कळा आली आहे. मागील दोन वर्षांपासून या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसादच दिला नाही. यंदा तर बांधावर खत पुरवठ्याची मागणीच नोंदविली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे.
कृषी विभागाने सन २०१२ मध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खताचा थेट गावातच पुरवठ्यासाठी बांधावर खत पुरवठा योजना सुरू केली. पहिल्या वर्षी या योजनेंतर्गत जिल्ह्यात खरीप हंगामात जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विदर्भ को-आॅप. मार्केटिंग सोसायटी यांच्या मार्फत शेतकरी गटाला ४५० मे टन खताचा बांधावर पुरवठा केला होता. त्यानंतर याच वर्षी रबी हंगामात मागणी नसल्याने निरंक राहिला तर सन २०१३ मधील खरीप हंगामात ९७.५० मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला. रब्बी हंगाम मात्र निरंक आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवात झाली. पाऊस नसल्याने बाजार थंड आहे. पण यावर्षी शासनाकडे खताचा बंफर स्टॉक नसला तरी खतसाठा जिल्ह्यात मुबलक आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी समूह गटाकडे कुठल्याही गावातील शेतकऱ्यांनी रासायनिक खताची मागणी नोंदविली नाही. परिणामी शेतकरी गटानेही रासायनिक खतपुरवठा करणाऱ्या नोडल अधिकारी यांच्याकडेही सध्या तरी रासायनिक खताची बांधावर पुरवठ्यासाठी मागणी नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र बांधावर खत पुरवठ्याची मागणी शेतकरी गटाकडून झाल्यास रासायनिक खतपुरवठा केला जाणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परंतु मागील दोन वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील या योजनेचे चित्र पहाल्यास योजनेला जिल्ह्यात थंड प्रतिसाद मिळाला असून भविष्यात ही योजना बंद पडण्याची चिन्हे आहेत.