अमरावती शहरात ‘लाख को पाच’, वाहतूक कोंडी आणि जीवघेणे प्रदूषण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 01:46 PM2022-03-10T13:46:09+5:302022-03-10T17:38:29+5:30
लोकांनी आपला पाठिंबा बस बूथवर आवडीच्या ब्रीदवाक्यांनी दर्शविला तसेच बस प्रवासादरम्यान अनुभवही सांगितले.
अमरावती : कोरोना काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली. त्यानंतर तर खासगी वाहनांचे पेवच फुटले आहे. त्यामुळे वाहतूककोंडी आणि जीवघेणे प्रदूषण यांचा विळखा शहरांना बसत आहे. त्यावर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरणाचे धडे अमरावतीकरांना नागपूर स्थित परिसर या संस्थेने दिले. त्यासाठी बुधवारी शहरात बसयात्रा काढण्यात आली होती. नागरिकांकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी असल्याबाबत मागणीपत्र भरून घेण्यात आले.
जून २०२० मध्ये परिसर संस्थेने राज्यातील शहरांमध्ये बससेवा सक्षम करण्याच्या हेतूने ‘लाख को ५०’ ही राज्यव्यापी मोहीम सस्टेनेबल अर्बन मोबिलिटी नेटवर्क (सम नेट) अंतर्गत सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत बुधवारी संस्थेच्यावतीने शहरात इर्विन चौक, माल टेकडी, राजकमल चौक, दसरा मैदान या मार्गाने काढण्यात आली. याअंतर्गत इर्विन चौक व दसरा मैदान येथे पथनाट्य करण्यात आले. या पथनाट्याच्या माध्यमातून लोकांच्या सिटी बसविषयीच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
लोकांनी आपला पाठिंबा बस बूथवर आवडीच्या ब्रीदवाक्यांनी दर्शविला तसेच बस प्रवासादरम्यान अनुभवही सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री डाॅ. सुनील देशमुख, नॅकच्या सदस्य स्मिता देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते. अमरावतीचे विपीन तातड यांनी रॅपमधून अमरावतीची लोकसंख्या व बसची संख्या याचे गुणोत्तर आणि यामुळे होणारे प्रवाशांचे हाल मांडले.
लाख को ५० केव्हा?
परिसरच्या ‘लाख को ५०’ या संकल्पनेनुसार अमरावतीच्या साडेसहा लाख लोकसंख्येसाठी सुमारे ३२५ बस अमरावती शहरात धावायला हव्यात. तथापि, अवघ्या २५ बस शहरातील शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. त्या ‘लाख को पाच’च होतात.