नियामक मंडळाच्या बैठकीकडे लोकप्रतिनिधींची पाठ
By admin | Published: January 8, 2015 10:46 PM2015-01-08T22:46:52+5:302015-01-08T22:46:52+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नियामक मंडळाची सभा गुरुवारी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विषयाला अनुसरुन बोलविण्यात आली होती.
अमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नियामक मंडळाची सभा गुरुवारी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विषयाला अनुसरुन बोलविण्यात आली होती. मात्र या बैठकीला केवळ जिल्ह्यातील एकाच आमदाराने हजेरी लावून इतर खासदार व आमदारांनी पाठ फिरविल्याचे चित्र सभेत पाहावयास मिळाले.
जिल्हा नियामक मंडळाच्या बैठकीत मागील सभेत कार्यवृत्त वाचून कायम करणे, अनुपालन मुद्यावर कारवाई करणे, एनआरएलएम अंतर्गत सन २०१४-१५ चा वार्षिक कृती आराखडा मंजूर करणे, इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१४-१५ च्या आराखड्यास मंजुरी देणे, एनआरएलएम योजनेंतर्गत प्रगतीचा आढावा, सुधारित राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेचा आढावा, इंदिरा आवास योजनेचा आढावा, रमाई आवास योजनेचा आढावा, मागासक्षेत्र अनुदान निधीचा आढावा, एसजीएसवाय अंतर्गत २० टक्के मूलभूत सुविधांमधून क्वॉर्टरजवळ बांधण्यात आलेल्या गाड्यांना वापरासाठीचा पुढील निर्णय घेणे, असे विषय सूचीच्या अजेंड्यावर ठेवण्यात आले होते. मागील वर्षी पहिल्यांदाच होत असताना या सभेकडेच जिल्ह्यातील आठ आमदारांपैकी केवळ एकाच आमदाराने हजेरी लावली. तर मोर्शीच्या आमदारांनी हजेरी न लावता त्यांच्या प्रतिनिधींना पाठवून त्यांचे विषय सभेत ठेवले. तर इतर लोकप्रतिनिधींनी बैठका व महत्त्वाची कामे असल्यामुळे नियमाक मंडळाच्या सभेला हजेरी लावली नसल्याचे समजते. विशेष म्हणजे खासदारांचीही या बैठकीला गैरहजेरी होती. एकंदरीत नियामक मंडळाची बैठक धामणगावचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्याच उपस्थितीत पार पडली. नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, हे मात्र सभेला उपस्थित होते. काही वेळानंतर दुपारी ४.३० वाजता मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी हजेरी लावली. मात्र इतर लोकप्रतिनिधी हजर नसल्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असलेल्या या सभेत धामणगाव रेल्वे मतदारसंघ वगळता इतर कुठल्याही प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. परिणामी ही सभा ठोस निर्णयाअभावीच आटोपती घ्यावी लागली. विशेष म्हणजे सभेला काही जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून आपल्या समस्या या बैठकीत मांडल्याचे दिसून आले.
सभेला प्रकल्प संचालक के.एम. अहमद, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्यासह बँकेचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि निवडक पंचायत समितीचे सभापती यांचीच उपस्थिती सभेत दिसून आली.