आदिवासी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:04 PM2018-01-31T22:04:58+5:302018-01-31T22:05:24+5:30
आदिवासी विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत खेळ, क्रीडा स्पर्धांमध्ये मागे राहू नये, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे धडे दिले जात आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : आदिवासी विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत खेळ, क्रीडा स्पर्धांमध्ये मागे राहू नये, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे धडे दिले जात आहे. त्याकरिता चिखलदरा येथे १० दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
न्युक्लीयस बजेट (केंद्रवर्ती योजनेंतर्गत) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने धारणी व चिखलदरा तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण २४० खेळाडू मुले, मुलींना खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, मैदानी खेळ या चार प्रकारातील खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या दहा दिवसांच्या कालावधीत तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांद्वारे निवासी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन चिखलदरा येथील श्री गिरीजन शारीरिक शिक्षण महाविद्यालयात करण्यात आलेले आहे. शिबिराचे उद्घाटन सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे.
क्रीडा प्रशिक्षणाचे उद्घाटन धारणी प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक पीयूष जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, चिखलदरा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संदीप बोळखे, प्राचार्य अतुल निंभेकर, अतुल पाटील आदी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणार्थी खेळाडूंना कबड्डी खेळासाठी अजय पुसदकर, भूषण भोसले, खो-खो अतुल निंभेकर, तुकेश सपकाळ, व्हॉलीबॉलसाठी राहुल शर्मा, हेमंत जोशी व मैदानी खेळ (अॅथलेटीक्स) अतुल पाटील, अक्षय येकुणकर, सुजित सरडे या तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांद्वारे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन व आभार बी.एस. महानकर यांनी केले. तर प्रशिक्षण शिबिराचे संयोजन अनिल बोरवार हे पाहत आहेत.