रक्त नदी-नाल्यात नव्हे, नाडीत वाहू द्या
By admin | Published: June 6, 2016 12:18 AM2016-06-06T00:18:51+5:302016-06-06T00:18:51+5:30
संत निरंकारी मिशनचे प्रमुख हरदेव बाबा यांचे नुकतेच कार अपघातात निधन झाले.
संत निरंकारी मिशन : ७०० दात्यांचे रक्तदान
अमरावती : संत निरंकारी मिशनचे प्रमुख हरदेव बाबा यांचे नुकतेच कार अपघातात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून शहरात ४ व ५ जून रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास ७०० दात्यांनी रक्तदान करून मिशनच्या कार्यात योगदान दिले आहे.
संत निरंकारी मिशन हे चार पिढीपासून सुरू असून अवतार गुरबचनसिंग बाबांनी केलेल्या महत्प्रयासाने मिशनला भरपूर सहयोग प्राप्त झाले. त्यांनी एकतेचा संदेश अवघ्या जगात पसरविण्याचा केलेला प्रयत्न खऱ्या अर्थाने त्यांचे सुपुत्र हरदेवसिंग बाबांनी केले. गुरबचनसिंग यांची २४ एप्रिल १९८० रोजी हत्या करण्यात आली. त्यामुळे 'रक्त नदी-नाल्यांत नव्हे, तर नाडीमध्ये वाहू द्या', असा संदेश हरदेवबाबांनी दिला. गुरबचनसिंग बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निरंकारी मिशनतर्फे जगभरात दरवर्षी २४ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. यावर्षी विश्वविक्रम असे २० लाख ८० हजार बाटल्या रक्त जमा झाल्याची नोंद करण्यात आली. त्याअनुषंगाने हरदेवसिंग बाबांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून शहरात ४ व ५ जून रोजी महारक्तदान शिबिर आयोजिले होते. यामध्ये ४ जून रोजी सिटीलँड व बिझिलँड येथे ३३५ दात्यांनी रक्तदान केल्याची नोंद झाली. रविवारी रामपुरी कॅम्पस्थित निरंकारी भवनात रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यामध्ये ३००० दात्यांनी रक्तदान केले. यासाठी कंवरनगर पुज्य पंचायत, शिवधारा समिती, अमरावती रक्तदान समितीचे महेंद्र भुतडा, अजय दातेराव यांच्यासह निरंकारी मंडळाचे संचालक महेशलाल पिंजानी, अशोकलाल पिंदवानी, सेवादल समितीचे मुकेश मेघानी, सुधीर, धामेचा, गुरुमुख पिंजानी, मनोज नावानी, रवि बजाज, सुरेश पिंजांनी, आनंद पिंजानी, सुनील शादी आदींचे योगदान लाभले.
५०० बॉटल्सचे 'टार्गेट'
निरंकारी मिशनचे प्रमुख हरदेव बाबा यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या श्रद्धांजलीप्रीत्यर्थ ४ व ५ जून रोजी अमरावती शहरात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ५०० बॉटल्स रक्त जमा करण्याचे 'टार्गेट' निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिर आयोजन समितीने ठरविले होते. मात्र हे महान कार्य पाहता या शिबिराला मिशनच्या सेवकांसह आदींनी भरभरून साथ दिल्याने हा आकडा जवळपास ७०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता मिशनचे संचालक अशोकलाल पिंदवानी यांनी व्यक्त केली.