“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे..!”
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:15 AM2021-08-15T04:15:34+5:302021-08-15T04:15:34+5:30
फोटो - राष्ट्रसंत १४ पी कॅप्शन - १९५० मध्ये ध्वजारोहण करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज (मोझरी) : १५ ऑगस्ट ...
फोटो - राष्ट्रसंत १४ पी
कॅप्शन - १९५० मध्ये ध्वजारोहण करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
गुरुकुंज (मोझरी) : १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तोफांच्या गडगडाटात, रोषणाईच्या झगझगाटात नि भारतमातेच्या बुलंद जयघोषात अशोकचक्रांकित तिरंगा राष्ट्रध्वज फडकू लागला होता आणि त्याला पंडित नेहरूंनीच नव्हे, तर ब्रिटिशांचे प्रतिनिधी माऊंटबॅटन यांनीसुद्धा सलामी दिली होती. सारा भारत यावेळी जागा होता. विदर्भातील १९४२ च्या क्रांतीचे प्रणेते, स्वातंत्र्य सेनानी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सेवामंडळाच्या शाखांना स्वातंत्र्यदिन विधायक कार्यरूपाने कसा साजरा करावा, या बाबतचा संदेश पाठविला होता. यात रामधून, सामुदायिक प्रार्थना, सूतयज्ञ, कुस्त्यांची दंगल, मर्दानी खेळ, अस्पृश्यासाठी विहिरी-देवळे खुली करणे आदींचा समावेश होता
१५ ऑगस्ट १९४७ रोजी जत संस्थानमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते घेण्यात आला होता. यावेळी ६० हजार लोकांच्या उपस्थितीत ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ हे गीत तिथेच रचून महाराजांनी सर्वांकडून गंभीरपणे वदवून घेतले. १५ ऑगस्टच्या रात्री वंदनीय महाराजांचा कार्यक्रम श्रीक्षेत्र पंढपूरला होता. सर्वांनी नव्या उमेदीने कामाला लागावे नि भारताला स्वर्गतुल्य बनवावे, असे त्यांना उत्कटतेने वाटत होते.
भारताच्या सुपुत्रांनो, उठा! घ्या राज्य हे हाता!
भाग्य उदयास आलेले, बाणू द्या अंगीच्या रक्ता!!
स्वातंत्र्यदेवतेचे हे पुजारी म्हणजे राष्ट्राचे नेते,सत्ताधिकारी यांना सुराज्यनिर्मितीच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याबरोबरच नव्या भारतातल्या नव्या पिढीत नवचैतन्य ओतण्याचे कार्य महाराज निरंतर करीत होते. याचा प्रत्यय गावोगावी प्रात:काळच्या ‘रामधून’मधील शिस्तबद्ध बालसेनेच्या जोशातून नि घोषातून सर्वांनाच आगळ्या रूपात येत होता. तो घोष होता
प्यारा हिंदुस्थान है, गोपालों की शान है!
वीरों का मैदान, जिसमे भक्तों के भगवान है!
‘आजच्या स्वातंत्र्याचा उपयोग करून घेऊन चारित्र्यवान, शीलवान, बलवान असा समाज निर्माण करण्याची स्वप्ने तुम्ही उराशी बाळगली पाहिजे. तुम्ही राष्ट्राचे भावी भाग्यविधाते आहात, ही गोष्ट लक्षात असू द्या,’असे त्यावेळी महाराजांनी सांगितले होते.
(साभार- जीवनयोगी खंड ६)
140821\img-20210814-wa0002.jpg
photo