विद्यार्थी घालणार ध्वनीप्रदूषणाला आळा
By admin | Published: February 13, 2017 12:10 AM2017-02-13T00:10:53+5:302017-02-13T00:10:53+5:30
वाढते ध्वनी प्रदूषण ही एक जटील समस्या बनली असून ध्वनी प्रदूषण थांबविण्यासाठी शासनाला अपयश येत आहे.
शिक्षण विभागाचा निर्णय : आरोग्याला अपायकारक
अमरावती : वाढते ध्वनी प्रदूषण ही एक जटील समस्या बनली असून ध्वनी प्रदूषण थांबविण्यासाठी शासनाला अपयश येत आहे. यावर उपाय म्हणून बालमनावर ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम बिंबविण्याबरोबरच आता ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्याचा आधार घेण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. तशा सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
वाहनाची दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी त्या माध्यमातून होणारे ध्वनी प्रदूषण तर लग्न मिरवणुकीत डीजे आणि फटाक्याच्या आवाजामुळे ध्वनी प्रदुषणामध्ये भर पडत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येते. मात्र याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. या ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यवर किती परिणाम होतो हे बालमनावर बिंबविण्यासाठी आता शाळांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षक व मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदुषणाबाबत माहिती देणार आहे व जागृती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. वाढत्या ध्वनी प्रदुषणाची गंभीर समस्या बनली आहे. ध्वनीप्रदबषणावर अनेक स्वयंसेवी संस्था काम करतात. वेळोवेळी आवाज उठविला आहे. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्नही होतो. मात्र याला नागरिकांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी बाल्यावस्थेत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून जनजागृती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ध्वनीप्रदूषणाच्या परिणामाची तीव्रता त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम विद्यार्थ्यांना कळावा, यासाठी शाळामधील मुख्याध्यापक व शिक्षक जनजागृती करणार आहेत. या बालकांच्या माध्यमातून त्याचे पालक व कुटुंबियांना ध्वनी प्रदुषणाबाबत माहिती मिळणार आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थी हाच खरा दूत
सध्या मोठ्या प्रमाणावर स्वच्छ भारत अभियान मोहीम देशपातळीवर राबविली जात आहे. या मोहिमेमध्ये देशभरातील शाळांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी हाच खरा स्वच्छतेचा दूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.