योग्य वेळी धडा शिकवू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:38 AM2018-11-19T00:38:59+5:302018-11-19T00:41:09+5:30
बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना माफी मागण्यासाठी दिलेली वेळ आता संपली आहे. त्यामुळे आम्ही राणा यांचा निषेध करावयास येथे जमलो आहोत. राणा यांनी यानंतर पुन्हा या प्रकारची वक्तव्ये केल्यास त्यांना वठणीवर आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते योग्यवेळी त्यांचा समाचार घेतील, असा दम दिनेश सूर्यवंशी यांनी भरला.
अमरावती : बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना माफी मागण्यासाठी दिलेली वेळ आता संपली आहे. त्यामुळे आम्ही राणा यांचा निषेध करावयास येथे जमलो आहोत. राणा यांनी यानंतर पुन्हा या प्रकारची वक्तव्ये केल्यास त्यांना वठणीवर आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते योग्यवेळी त्यांचा समाचार घेतील, असा दम दिनेश सूर्यवंशी यांनी भरला.
भाजपक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वातील भाजपने राजकमल चौकात दुपारी आमदार रवि राणा यांचा निषेध करून रस्त्याच्या श्रेयवादावरून तापलेल्या राजकारणात आणखी कडी जोडली असली तरी सूर्यवंशी यांनी दोन दिवस केलेल्या गर्जनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेले चोख प्रत्युत्तर मात्र ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ असे असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय स्तरावर उमटल्या.
राणा यांनी केला मुख्यमंत्र्यांचा अपमान
राणा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचल्यास त्यात रस्त्याच्या कामाचा उल्लेख नाही. विविध निधींचा उल्लेख आहे. त्या पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली. मुख्यमंत्र्यांना दिलेले ते पत्र प्रसिद्धीसाठी जाहीर करून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा अपमान केला आहे, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला. स्वत:लाच विकासपुरुष दर्शविणाऱ्या राणा यांच्या खोटारडेपणाबाबत आम्ही येत्या अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. कागदपत्रांसह मुद्दा मांडणार आहोत. सरकारला पाठिंबा असणाºया आमदारांना करावयाची ती मदत जरूर करावी; परंतु संघटनेचा अपमान आम्ही मुळीच सहन करणार नाही, हेदेखील मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत, असेही सूर्यवंशी म्हणाले. अवघ्या अर्धा तासात या निषेध कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी निवडक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
योग्य वेळ कधी येणार?
रवी राणा : हे घ्या पुन्हा म्हणतो, 'बालकमंत्री'!
अमरावती : हे सांगण्यासाठी २४ तासांचा इशारा देण्याची काय गरज होती? सत्तेत असूनही भाजप जिल्हाध्यक्षांची वेळ योग्य नसेल, तर योग्य वेळ येणार तरी केव्हा, असा सवाल बडनेºयाचे आमदार रवी राणा यांनी योग्य वेळी समाचार घेण्याची भाषा करणाऱ्या भाजपजनांना केला आहे.
'लोकमत'शी बोलताना आमदार राणा म्हणाले, तक्रार करण्यासाठी अधिवेशनाची वाट बघण्याची काय गरज आहे? आत्ताच करा ना तक्रार! तुमच्या घरातला विषय आहे ना; मग फोनवरही केली जाऊ शकते की तक्रार! पण लक्षात ठेवा, पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यापेक्षाही मीच मुख्यमंत्र्यांचा जवळचा आहे. यापूर्वीही पालकमंत्र्यांना मी इशारे दिले आहेतच. शाब्दिक गुद्दागुद्दीही अनेक बैठकांमध्ये झाली. त्याच्याही गंभीर तक्रारी करून झाल्याच की! जितका लावायचा तितका जोर या चार वर्षांत पालकमंत्री प्रवीण पोटे आणि भाजपजनांनी लावला आहेच. मुख्यमंत्र्यांजवळ या मंडळींची किंमत असती, तर माझे महत्त्व कमी झाल्याचे दिसले असते. मात्र, तसे झाले नाही. यापुढेही होणार नाही. प्रसिद्धीसाठी बालीश कृत्ये करणे हेच पालकमंत्र्यांच्या आणि वायफळ बडबड करणे हे सूर्यवंशीच्या हाती आहे. तितके ते करतात, असा थेट प्रहार आमदार राणा यांनी केला.
राणा यांनी पुन्हा याप्रकारची वक्तव्ये केल्यास भाजपजन योग्य वेळी समाचार घेतील, या आव्हानाला उत्तर देताना आमदार राणा म्हणाले, आत्ताच म्हणतो, पुन्हा पुन्हा म्हणतो - बालकमंत्री! प्रतिक्रिया नोंदविताना त्यांनी प्रत्येक वेळी पालमंत्र्यांऐवजी बालकमंत्री हाच शब्द उच्चारला. हे त्यांचे वक्तव्य जाहीर करण्यास सांगून दम असेल, तर भाजपवाल्यांनी आणि बालकमंत्र्यांनी काय ते करूनच दाखवावे, असा प्रतिइशाराही त्यांनी दिला. दोन दिवस तयारी करूनही राजकमल चौकात ५० लोक जमवू न शकणाºया, लोकांमधून निवडून येण्याची योग्यता नसलेल्या पोटेंनी मला असे दूधपित्यांच्या आडून इशारे देऊ नये. मी आवाज देण्याचाच अवकाश, जयस्तंभपासून तर राजापेठपर्यंत पाय ठेवण्यासही जागा उरणार नाही. अशी गर्दी जमवितो की नाही ते पहाच! पण, मीच यांना पुरून उरत आल्याने माझ्या चाहत्यांना त्रास देण्याची आत्ताच गरज नाही, असा गर्भीत इशारा राणा यांनी दिला.