ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करू - पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 05:00 AM2021-06-12T05:00:00+5:302021-06-12T05:00:33+5:30
दुसऱ्या लाटेत सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सुसज्ज उपचार यंत्रणेसह काटेकोर नियमपालन आवश्यक आहे. उपचार यंत्रणा बळकट होण्याच्या दृष्टीने कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. कोविडपश्चात दक्षतेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण तसेच ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दर्यापूर येथे स्पष्ट केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ना. ठाकूर यांच्या उपस्थितीत आमदार बळवंत वानखडे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची शुक्रवारी पायाभरणी झाली. ५८.६० लाख रुपये निधीतून ऑक्सिजन प्लांट आकारास येणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, तहसीलदार योगेश देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष दाबेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दौऱ्यात मान्यवरांनी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर, अचलपूरचे कुटीर रुग्णालय येथे भेट देऊन उपचार यंत्रणेचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी सादरीकरण केले. तालुका आरोग्य अधिकारी किरण शिंदे, मो. नासीर आदी उपस्थित होते.
आवश्यकतेनुसार वैद्यकीय मनुष्यबळही मिळवून देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश ना. यशोमती ठाकूर यांनी आरोग्य प्रशासनाला दिले.
तिसऱ्या लाटेची खबरदारी आवश्यक - नाना पटोले