Vidhan Sabha Election 2019; निवडणूक विभागाचे बँकांना पत्र : उमेदवारांच्या बँक खात्यावर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:38 PM2019-10-03T12:38:45+5:302019-10-03T12:39:12+5:30
यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष देण्यासाठी उपाययोजना चालविल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणूक २१ ऑक्टोबर रोजी होऊ घातली असून, ८ ऑक्टोबरपासून प्रचाराला प्रारंभ होणार आहे. यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष देण्यासाठी उपाययोजना चालविल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. मात्र, निवडणूक काळात उमेदवारांच्या खात्यात संशयित व्यवहार झाल्यास ही माहिती निवडणूक विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र निवडणूक आयोगाने बँकांना पाठविले आहे. दररोज माहिती न कळविल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
युती, आघाडी, वंचित बहुजन आघाडी, बसपा व अन्य राजकीय पक्षांचे तिकीट वाटपाचे गुºहाळ गुरुवारी संपुष्टात येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात झाली की, खर्चाचे काऊंटडाऊन सुरू होते. विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग, पोलीस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे.
निवडणूक काळात काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोग व आयकर विभागाने कंबर कसली आहे. राजकीय पक्ष, उमेदवारांच्या आर्थिक उलाढालीवर करडी नजर राहणार आहे. काळा पैसा शोधण्यासाठी आयकर विभागाने शीघ्र कृती पथक तयार केले आहे. दुसरीकडे संशयित व्यवहारांची माहिती बँकांना दररोज निवडणूक विभागाला देणे अनिवार्य केले आहे. यात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी, को-ऑपरेटिव्ह बँकांचा समावेश आहे. याशिवाय कोणत्याही बँकांमधील खात्यात मोठ्या रकमेचा भरणा किंवा रक्कम काढण्यात आली असेल, ज्या खात्यात व्यवहार होत नाही, पण अचानक निवडणूक काळात या खात्यात लाखो रुपये जमा झाले असतील, तर अशा सर्व संशयित खात्यांची माहिती बँकांना दररोज सायंकाळी निवडणूक विभागाला द्यावी लागणार आहे.
बँकांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास ही बाब निवडणूक विभागाच्या लक्षात येताच बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांच्या खात्यासंदर्भात सायंकाळी ६ वाजेपर्यंत बँकांना माहिती पाठवावी, असे निवडणूक आयोगाने पत्राद्वारे कळविले आहे.
प्राप्तिकर विभागाचे स्वतंत्र पथक
निवडणूक काळात काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाचे स्वतंत्र पथक राहणार आहे. जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये प्राप्तिकर विभागाची चमू कार्यरत राहील. प्राप्तिकर विभागाचे पथक हे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी निगडीत असणार आहे.