पर्यायी मार्गासाठी रेल्वे प्रशासनाला पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:14 AM2018-01-24T00:14:37+5:302018-01-24T00:15:02+5:30
राजापेठ रेल्वे क्रॉसिंगच्या बांधकामासाठी फाटक बंद करण्यात येणार असून पर्यायी मार्ग म्हणून दुसऱ्या ठिकाणी फाटक द्यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : राजापेठ रेल्वे क्रॉसिंगच्या बांधकामासाठी फाटक बंद करण्यात येणार असून पर्यायी मार्ग म्हणून दुसऱ्या ठिकाणी फाटक द्यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर पर्यायी मार्गाची निवडण्यासाठी रेल्वे प्रशासनाला महापालिकेकडून पत्र पाठविले जाणार आहे.
राजापेठ रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मार्ग बंद केला जाणार आहे. हा मार्ग बंद केल्यास वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय मंडळीचे चिंतन सुरू आहे. पर्यायी मार्ग दिल्याशिवाय फाटक बंद करू देणार नाही, असा पावित्रा नागरिकांसह नगरसेवकांनी घेतला आहे. यावर तोडगा काढण्यासंदर्भात मंगळवारी बैठक पार पडली. यावेळी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, सहायक पोलीस आयुक्त सोनोने, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, दुर्गेश तिवारी, अभियंता सुहास चव्हाण, सहायक अभियंता मंगेश कडू, अनंत अवघाते, सीपीएफ मुंबईचे संजय समुद्रकर, सहा. कार्यकारी अभियंता, भुसावळ मध्य रेल्वेचे सी.आर.जी. पांडे, मध्यरेल्वे भुसावळ येथील वरिष्ठ अनुभाग अभियंता एन.पी.पाटील, सहा. कार्यकारी अभियंता आर.जी.पाण्डेय, राकेश जयस्वाल, सतीश बोरकर, उपमहापौर संध्या टिकले, गटनेता चेतन पवार, मुन्ना राठोड, पद्मजा कौंडण्य, बलदेव बजाज, महापालिका शहर अभियंता जीवन सदार उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी व नगरसेवकांमध्ये झालेल्या चर्चेत पर्यायी मार्गाविषयावर मंथन झाले. यामध्ये नगरसेवकांनी भाजीबाजाराचा ओटे तोडून पर्यायी मार्ग काढण्याचा मुद्दा ठेवला. मात्र, तसे केल्यानंतर उड्डानपुल कार्यात अडसर निर्माण होत असल्याची शंका उपस्थित झाली. या चर्चेनंतर तोडगा न निघल्यामुळे प्रशासकीय अधिकारी व नगरसेवकांनी थेट राजापेठ रेल्वे फाटकाजवळ जाऊन पाहणी केली. रेल्वे फाटकाच्या डाव्या बाजुला छोटा मार्ग होऊ शकतो, असे निदर्शनास आले. मात्र, फाटक दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी आवश्यक असते, त्यानुसार रेल्वे प्रशासनाला फाटक दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासंदर्भात पत्र पाठवून मंजुर घेण्याचा निर्णय झाला. पुढील दोन दिवसात रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे फाटक हलविण्यासाठी काय निर्णय येईल, याची प्रतीक्षा आहे.