लेव्हल चुकल्यानेच पाणी मागे सरकले
By admin | Published: May 14, 2017 12:01 AM2017-05-14T00:01:53+5:302017-05-14T00:01:53+5:30
प्रकल्पांची लेव्हल चुकल्यानेच पाणी मागे सरकले व समस्या वाढल्यात. पुनर्वसनात मूलभूत सुविधांचाही अभाव आहे.
वीरेंद्र जगताप आक्रमक : तीन वर्षांपासून कामे रखडली, देखभाल दुरुस्तीसह दर्जेदार पुनर्वसन नाहीच
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रकल्पांची लेव्हल चुकल्यानेच पाणी मागे सरकले व समस्या वाढल्यात. पुनर्वसनात मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. येथे मागील दहा वर्षांत पिण्याचे पाणीही उपलब्ध झालेले नाही. प्रकल्पग्रस्तांना दिलेला शब्द राज्याचे मुख्यमंत्री पाळत नाहीत. रस्त्यांची कामे रखडली आहेत. देखभाल दुरुस्तीसह मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असणारे हेच का दर्जेदार पुनर्वसन? असा सवाल आ. वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा सभेत केला.
बेंबळा, निम्न वर्धा, कोहळा यासह अन्य प्रकल्पबाधित गावांच्या समस्यांसदर्भात बैठक आयोजित होती. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह आढावा घेतला. बैठकीला या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यासह विदर्भ पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
धामक येथील पुनर्वसनात प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत रस्ते रखडले आहे. प्रकल्पाच्या ११६ कोटींपैकी फक्त ३७ कोटी अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या वाट्याला आले आहेत. येथील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. चौकशी समिती केव्हा अहवाल देणार, असा सवाल आ.जगताप यांनी केला. २०१३-१४ मधील प्रशासकीय मान्यता असलेली कामे अद्याप पूर्ण झालेली नाही. २४ पैकी केवळ ८ कामेच पूर्ण झालेली आहेत. ९ प्रगतीपथावर आहेत. कलम १४३ अन्वये तहसीलदारांनी नोटीस बजावली असताना कामे का रखडली याचा जाब त्यांनी विचारला.
पावसाळ्यात कामे करणार काय ?
अमरावती : ३०० हेक्टर जमीन पाण्याखाली जाते. २६८.५० या पातळीवर शेती पाण्याखाली जाते. जमिनीचा ताबा घेईपर्यंत दोन पिके वाहून जाणार, अशी स्थिती आहे. घुईखेड येथील अनेक कामे रखडली आहेत.
२०१३-१४मध्ये प्रशासकीय मान्यता असलेली कामे रखडली आहेत. कंत्राटदाराला २८ लाखांचा धनादेश दिला असताना कामे झालेली नाहीत. आता पावसाळ्यात ही कामे करणार काय, असे आमदार वीरेंद्र जगताप म्हणाले.
या पावसाळ्यात रखडलेल्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करा. संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या समवेत प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांशी संवाद होत नाही. हा संवाद झाला पाहिजे. यामधून स्थानिक अडचणींचा निपटारा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले. ही कामे पावसाळ्यापूर्वीच करणे गरजेचे असल्याने तातडीने कामाला सुरुवात व्हावी, असे ते म्हणाले.असंपादित क्षेत्राचे पंचनामे होतील
प्रकल्पासाठी असंपादित शेतांमधील पिकांचे नुकसान झाल्यास पंचनामे करण्यात येईल, शेती वहिवाटीचे रस्ते प्राधान्याने पूर्ण करा. बुडीत क्षेत्रामध्ये रस्ते का झाले नाहीत, याविषयीची विचारणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. रस्ते, पुनर्वसनाच्या कामासाठी रॉयल्टी भरल्यावर कंत्राटदार मजुराद्वारे मुरूम काढतो की मशिनद्वारे, हा प्रश्न गौण आहे. प्रत्यक्षात तहसीलदार व एसडीओंशी प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी संवाद साधल्यास कुठलीही अडचण येणार नाही. कामे त्वरित मागे लागतील, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर म्हणाले.