पाच औषधी प्रतिष्ठानांचे परवाने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 12:23 AM2017-02-03T00:23:39+5:302017-02-03T00:23:39+5:30
औषधी प्रशासन विभागाने वर्षभरात जिल्ह्यातील ५९३ औषधी विक्रेत्यांची (मेडिकल) तपासणी केली.
५९३ विक्रेत्यांची तपासणी : विभागाची कारवाई
अमरावती : औषधी प्रशासन विभागाने वर्षभरात जिल्ह्यातील ५९३ औषधी विक्रेत्यांची (मेडिकल) तपासणी केली. यात औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना काही त्रुटी आढळल्यामुळे ४२ मेडिकल शॉपीचे काही कालावधीसाठी परवाने निलंबन करण्यात आले आहेत. ५ दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्याचीही कारवाई करण्यात आले आहे. ही करवाई १ एप्रिल ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यात किरकोळ औषधी विक्रेत्यांचे १,२०९ मेडिकल आहेत. घाऊक व होलसेल औषधी विक्रेते ३५६ आहेत. ड्रगिस्ट व केमिस्ट विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लघंन झाल्यास औषधी निरीक्षक कारवाई करतात. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे. किरकोळ चुका झाल्यास काही दिवसांसाठी मेडिकल परवाना निलबंन केले जाते. गंभीरप्रकरणी परवाने कायमचे निलंबन करण्याची कारवाई केली जाते. यावर्षी झालेल्या तपासणीत दोषी आढळल्याने ५ मेडिकलच्या संचालकाविरुद्ध कारवाई करून ५ दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्ध करण्यात आले आहेत.
काय आहेत नियम ?
मेडिकलमध्ये औषधी विक्री करताना नोंदणीकृत फॉर्मासिस्ट अनिवार्य असतो. तसेच किरकोळ औषधी व घाऊक विक्रेत्यांकडे 'फ्रिज' असणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक औषधी विक्री करणाऱ्या ग्राहकाला पक्के बिल दिले पाहिजे, येथे औषधी खरेदी बिल लावलेले असावे, नियम ५६ नुसार सदर तपासणी करण्यात येते, ज्या औषधी कालबाह्य झाल्या आहेत, त्याकरिता मेडिकलमध्ये वेगळा बॉक्स असणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी 'एक्सपायरी मेडिसीन नॉट फॉर सेल' असे लिहिलेले असावे, तसेच औषधी प्रशासन विभागाने ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारे व औषधी डॉक्टरांच्या सूचकतेशिवाय औषधांची विक्री करणे बंधनकारक आहे.