कंपन्यांद्वारा खतांची लिकिंग, विक्रेत्यांद्वारा शेतकऱ्यांच्या माथी
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 30, 2023 15:35 IST2023-06-30T15:34:23+5:302023-06-30T15:35:15+5:30
सर्रास लूट : डीएपी, १०:२६:२६, युरियाच्या सोबत सल्फर अन् २०:२०:०१३

कंपन्यांद्वारा खतांची लिकिंग, विक्रेत्यांद्वारा शेतकऱ्यांच्या माथी
अमरावती : पावसाच्या विलंबामुळे पेरण्या लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यातच भर म्हणजे कपाशीच्या काही वाणांचा तुटवडा झालेला आहे. आता रासायनिक खतांचीदेखील लिकिंग होत असल्याने शेतकऱ्यांची सर्रास लूट होत आहे. यामध्ये खतांचे लिकिंग आता थेट कंपनी स्तरावरून होत असल्याने विक्रेतेदेखील मागणी नसणारे खत शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे वास्तव आहे.
शेतकऱ्यांची तक्रार असल्यासच कृषी विभागाद्वारा या प्रकारात कारवाई होत असल्याने विक्रेत्यांचे फावले आहे. तर, विक्रेत्यांशी मधुर संबंध असल्याने व प्रसंगी उधारीवर कृषी निविष्ठा मिळत असल्याने शेतकरी लूट सहन करीत असल्याचे वास्तव आहे.
या हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांची मागणी असलेल्या डीएपी, १०:२६:२६ व युरिया या खतांसोबत कंपन्या लिंक करीत आहेत. यामध्ये २०:२०:०:१३ व सल्फर हे रासायनिक खत घ्यावे लागत आहे व शेतकऱ्यांना द्यावे लागत असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. या खतांचा स्टॉक तरी किती करणार, त्यामुळे आता जास्त खत बोलावतच नसल्याचे सांगण्यात आले.