६० फूट खोल विहिरीतून वाचविले अजगराचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:08 PM2017-12-29T23:08:02+5:302017-12-29T23:08:45+5:30
६० फूट खोल विहिरीत पडलेल्या अजगराला सुखरूप बाहेर काढून सर्पमित्रांनी जीवदान दिले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : ६० फूट खोल विहिरीत पडलेल्या अजगराला सुखरूप बाहेर काढून सर्पमित्रांनी जीवदान दिले. दर्यापुरातील रजतपुरा येथील रहिवासी निरतकर यांच्या घराच्या आवारात जुन्या विहिरीत अजगर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत होता. वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी त्याच्या उपचारासाठी पुढाकार घेतला आहे.
मुरली निरतकर यांच्याकडील विहिरीत कोंबडीचे पिल्लू पडले होते. त्यामुळे त्यांनी डोकावून पाहिले असता, अजगर आढळून आला. त्यांनी सर्पमित्र विशाल ठाकूर व राज वानखडे यांना बोलावले. परिस्थिती ओळखून विशाल दोराच्या साहाय्याने स्वत: विहिरीत उतरला आणि त्यानेच सुस्त पडलेल्या अजगराला शिताफीने बाहेर काढले. पशू चिकित्सालयात पशुधन विकास अधिकारी उफाळे यांनी उपचार केले. दुसºया दिवशी उपवनसरंक्षक हेमंतकुमार मिणा यांच्या निर्देशानुसार शिकार प्रतिबंधक पथकाचे वीरेन उज्जैनकर यांनी अजगराला ताब्यात घेतले.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रयत्न फळाला
स्थानिक किशोरनगरात माकडाचे पिल्लू आपसी लढाईतून कुत्र्यांच्या तावडीत सापडले व गंभीर जखमी झाले. वन्यप्रेमी संजय बोरकर व अभिजित लहुकर माकडाच्या मदतीला धावले. पिल्लाला पशुवैद्यक पोटफोडे यांच्याकडे नेले. दीड तासाची सर्जरी करण्यात आली. पुढील अन्न, औषध, व उपचार अमरावती येथील द्राक्षवेल नेचर फ्रेंड ग्रुप करीत आहे.