महिनाभरात उष्माघाताच्या ४६ रुग्णांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:27 PM2019-06-03T23:27:06+5:302019-06-03T23:27:28+5:30
मे महिन्यात तीव्र उन्हाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील ४६ रुग्णांना शासकीय रुग्णालयांत जीवनदान मिळाले. १०२ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला.
इंदल चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मे महिन्यात तीव्र उन्हाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील ४६ रुग्णांना शासकीय रुग्णालयांत जीवनदान मिळाले. १०२ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला.
यंदा कोसळलेल्या अल्प पावसामुळे सिंचनाअभावी जमिनीतील आर्द्रता कमी झाली. मार्च एंडिंगपासूनच उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली. हवामान खात्याने एप्रिल आणि मेमध्येही अलर्ट जारी केला. लोकसभा निवडणुकीच्या उत्साहामुळे एप्रिलमध्ये उन्हाचे चटके तेवढे जाणवले नाही. मे महिन्याची सुरुवातच ‘हीट वेव्ह’ने झाला. अवघा महिनाभर ४५ ते ४६.६ अंशापर्यंत तापमान राहिले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या काही नागरिकांना उष्माघाताचा फटका बसला. असे जिल्ह्यातील विविध भागांतून ४६ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना योग्य औषधोपचाराने बरे करून घरी पाठविण्यात आले. मात्र, काही जण अत्यवस्थेत असताना रुग्णालयात नेण्यात आल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. असे धामणगाव तालुक्यातील पाच रुग्ण, तिवसा तालुक्यातील दोन, चांदूर बाजार तालुक्यातील एक, वरूड तालुक्यातील एक व अमरावती शहरात तीन अशा १२ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालाअंती नेमके कशामुळे मृत्यू झाला, हे स्पष्ट होईल.
जिल्ह्यात महिनाभरात १०२ शवविच्छेदन
यंदा उच्चांकी तापमानाचा फटका सहन न करू शकल्याने तसेच अपघातात जिल्ह्यातील १०२ जणांचा मृत्यू १ ते ३१ मे दरम्यान झाला. त्यांचा शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात करण्यात आले. मात्र, अहवाल अद्याप अप्राप्त असल्यामुळे यातील किती जण उष्माघाताचे बळी ठरले, हे निश्चत सांगणे अशक्य आहे. उष्णतेची लाट आठवडाभर असल्याने काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन आहे.
उष्माघाताच्या ४६ रुग्णांवर शासकीय रुग्णालयांत यशस्वी उपचार झाला. याशिवाय काही जणांचा बाहेरच मृत्यू झाला. अशा रुग्णांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.
- श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती