निंभोरा येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:36+5:302021-09-17T04:17:36+5:30
अमरावती : गावकऱ्यांना त्यांच्या हक्काबाबत कायदेशीर मार्गदर्शन करून जनजागृती करणाऱ्या तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप व १० हजार रुपये दंड ...
अमरावती : गावकऱ्यांना त्यांच्या हक्काबाबत कायदेशीर मार्गदर्शन करून जनजागृती करणाऱ्या तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ३ निखिल मेहता यांनी १६ सप्टेंबर रोजी हा निर्णय दिला.
विधी सूत्रांनुसार, सुनील अंबादास गवारले (४२, रा. निंभोरा बोडखा, ता. धामणगाव रेल्वे) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. कैलास नामदेव पांडे असे मृताचे नाव आहे. ४ जुलै २०१८ रोजी निंभोरा बोडखा येथे ही खुनाची घटना घडली होती. घटनेच्या दिवशी सायंकाळी ६ च्या सुमारास फिर्यादी छबुताई पांडे यांना मुलगा कैलासच्या ओरडण्याचा आवाज आला. घराबाहेर जाऊन पाहिले असता, कैलास हा प्रकाश बारबुद्धे यांच्या अंगणात रक्तबंबाळ स्थितीत पडलेला दिसला. तेथून आरोपी सुनील गवारले हा येताना दिसला. त्याने भाल्याचा पाता कपड्याला पुसला व छबुताईकडे कटाक्ष फेकत तेथून दुचाकीने निघून गेला. कैलासला दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याबाबत मूताची आई छबुताई पांडे यांनी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मृताने आरोपीच्या भावाला अचल मालमत्तेसंबंधात त्यांच्या अधिकाराबाबत अवगत केले होते. त्याचा राग मनात धरून आरोपीने आपल्या मुलाचा भाल्याच्या पात्याने भोसकून खून केला, अशी तक्रार त्यावेळी नोंदविण्यात आली होती.
/////////////
बॉक्स
प्रत्यक्ष साक्षीदार फितुर
याबाबत मंगरूळ दस्तगीर ठाण्याचे तत्कालीन एपीआय विवेकानंद राऊत यांनी तपास पूर्ण करून ३० सप्टेंबर २०१८ रोजी दोषारोपपत्र दाखल केले. यात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्ष साक्षीदार प्रकाश पाचबुद्धे याला फितुर घोषित करण्यत आले. अभियोग पक्षाने तपासलेल्या साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरण्यात आले. ठोठावलेल्या १० हजार रुपये दंडापैकी नऊ हजार रुपये फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता दिलिप तिवारी यांनी युक्तिवाद केला.
///////////