पत्नीची हत्या करणाऱ्याला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:44 AM2019-06-20T01:44:48+5:302019-06-20T01:45:19+5:30
पत्नीला ठार मारणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नरेश शामराव युवनाते (३६,रा.जामगाव) असे, गुन्हेगाराचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालय (५) चे न्यायाधीश निखील मेहता यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पत्नीला ठार मारणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नरेश शामराव युवनाते (३६,रा.जामगाव) असे, गुन्हेगाराचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालय (५) चे न्यायाधीश निखील मेहता यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला.
विधी सूत्रानुसार, नरेश युवनाते याने राधा यांच्याशी प्रेमविवाह केला. त्यांना एक मुलगी व एक मुलगा, अशी दोन अपत्ये झाली. मात्र, पती नरेश दारू पिऊन पत्नी राधाला मारहाण करीत होता. १० मार्च २०१७ रोजी राधा यांनी पती नरेशविरुद्ध शेंदूजनाघाट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दरम्यानच्या काळात युवनाते दाम्पत्यांची दोन्ही मुले मोठ्या वडिलांकडे राहायला गेले. १० एप्रिल २०१७ रोजी राधा ही तिच्या गावातील बहीण राघू सुनील कसलीकर यांच्याकडे गेली. त्यांनी बहिणीला पतीच्या मारहाणीबद्दल सांगितले. दरम्यान, नरेश तेथे पोहोचला. त्याने बँकेतून पैसे आणण्याचे कारण सांगून राधाला सोबत घेऊन गेला. ११ एप्रिल २०१७ रोजी दुपारी राधा यांचा मुलगा मावशी राघू कसलीकर यांच्याकडे गेला. मावशीने आईबद्दल त्याला विचारले. बाबांनी आईला मारहाण केल्यामुळे ती झोपली आहे, असे त्याने मावशीला सांगितले. त्यामुळे राघू बहीण राधाला पाहण्यासाठी तिच्या घरी पोहोचली. तिचे घर बंद दिसले. घरासमोर रक्त सांडलेले दिसले. त्यामुळे राघू यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी राधा यांच्या अंगावर पांघरूण होते. त्यांनी पांघरूण काढून पाहिले असता, त्यांना राधा मृतावस्थेत आढळली. राघू कसलीकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती नरेश युवनातेविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला. पोलीस अधिकारी शेषराव नितनवरे यांनी आरोपीला अटक केली. आरोपीने पत्नीला काठीने मारहाण करून जीवे ठार केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी अभियोक्ता दीपक आंबलकर यांनी दहा साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोपीचा दोष सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपी नरेश युवनातेला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.