‘जीवनदायी’तून तीन वर्षांत १३०० रूग्णांना जीवदान
By admin | Published: April 2, 2016 12:06 AM2016-04-02T00:06:29+5:302016-04-02T00:06:29+5:30
निरोगी महाराष्ट्र, प्रगत राष्ट्र अशी संकल्पना घेवून सुरू झालेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेने तीन वर्षात ...
धामणगाव तालुका अव्वल : चार कोटी रुपयांचा खर्च
धामणगाव (रेल्वे) : निरोगी महाराष्ट्र, प्रगत राष्ट्र अशी संकल्पना घेवून सुरू झालेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेने तीन वर्षात तालुक्यातील १ हजार २९६ रूग्णांना नवे जीवनदान मिळाले आहे़ कर्करोग, किडनी, हृदयरोग अशा दुर्धर आजारावर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली़ ४ कोटी रूपये रूग्णांच्या उपचारासाठी खर्च करण्यात आले आहे़
दारिद्रय रेषेखालील कुटूंबाना चांगला उपचार खासगी रूग्णालयाच्या सहाय्याने मिळावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली़ तालुक्यातील तब्बल १ हजार २९६ रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे़ मागील तीन वर्षात हृदयरोगाने पीडित रूग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली़ किडणी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ या रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर या रूग्णांना नवे जीवनदान मिळाले आहे़ आपल्या जीवनात दैनंदिन कोणत्या घडामोडी घडणार, याची पुसटशी कल्पना नसताना तब्बल ८४ जणांचे अपघात यावर्षात झाले़ काहींना औषधोपचाराने तर तब्बल ४० अपघातग्रस्त रूग्णांवर शस्त्रक्रिया झाल्याने आज या रूग्णांना चालणे, धावणे शक्य झाले आहे़
धकाधकीच्या जीवनात आज माणूस स्वत:कडे लक्ष देणे विसरले आहेत़ मुत्रपिंडानेग्रस्त ६२ रूग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया झाल्या आहेत़ हाडाचे विकार तालुक्यातील १७८ रूग्णांना आहेत़ यापैकी ६९ रूग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली़ १९२ बालकांवर विविध शस्त्रक्रियाद्वारे उपचार करण्यात आले तर तीनशे महिलांना विविध आजारांनी ग्रस्त असताना १८७ महिलांवर विविध पध्दतीने शस्त्रक्रिया करून जीवनदान देण्यात आले आहेत़ राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना गोरगरिबांसाठी वरदायिनी ठरली.
येथे होतो उपचार
जिल्ह्यातील सामान्य रूग्णालय, एस़डी़एच-१०० अचलपूर अतिविशेषज्ञ रूग्णालय, स्त्रियांसाठी जिल्हास्तरीय रूग्णालय, डॉ़पंजाबराव देशमुख रूग्णालय, दयासागर रूग्णालय, उच्चतंत्र विविध विशेषज्ञ रूग्णालय व संशोधन केंद्र, पारश्री रूग्णालय, मुरके रूग्णालय, सुयश रूग्णालय, श्री संत अच्युत महाराज ह्दय रूग्णालय,अरोरा कॅन्सर हॉस्पीटल येथील रूग्णालयात, राजीवगांधी जिवनदायी आरोग्य योजनेचा लाभ रूग्णांना मिळत आहे़
पिवळे तथा केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा हे कार्डधारक जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतात. तालुक्यातील सर्वाधिक रूग्ण यवतमाळ, वर्धा, नागपूर ,मुंबई येथे पाठविण्यात येते़ जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारी ही महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे़ तालुक्यातील १ हजार२९६ रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे़
- राजेंद्र जगताप, आरोग्यमित्र,
धामणगाव रेल्वे राजीव गांधी जिवनदायी योजना