बादलीभर पाण्यासाठी जीव धोक्यात, मेळघाटातील पाणीटंचाईचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 02:19 PM2022-06-05T14:19:14+5:302022-06-05T14:31:48+5:30
सोशल मीडियावर अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे
अमरावती - उन्हाळा संपत आला असून मान्सुनपूर्व पावसानेही हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील मेळघाटात मोठ्या पाणी समस्येला तोंड द्यावे लागते. एकीकडे महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे नेतेमंडळी अभिमानाने सांगतात. मात्र, मेळघाटातील पाण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या महिलांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतात.
सोशल मीडियावर अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्रायबल आर्मी या ट्विटर हँडलनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, टँकरचे पाणी विहिरीत पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे या विहिरीच्या कडेनं हातात दोर बांधलेले कँड, बादल्या किंवा पाणी साचविण्याचे भांडे घेऊन महिला जीवाची ओढाताण करताना दिसत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील तहानलेल्या आदिवासींची दारूण अवस्था. टॅंकर आल्यानंतर बादलीभर पाण्यासाठी @CMOMaharashtra@AdvYashomatiINChttps://t.co/ncEL19Cj9e
— Shrimant Mane (@ShrimantManey) June 4, 2022
मेळघाटातील नागरिक चातकाप्रमाणे टँकरची वाट पाहतात. टँकर ओतला गेला की, संपूर्ण गाव धावत सुटते विहिरीकडे जातात. दोरखंडाने बांधलेल्या शेकडो बादल्या एकाच वेळी विहिरीत पडतात. मात्र, ज्याची बादली पाण्याने भरली, तो नशीबवान. हे चित्र आहे मेळघाटातील खडीमल गावाचे. चिखलदरा तालुक्यातील खडीमलसह २० गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना आदिवासी करीत आहेत. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मेळघाटात २५ वर्षांपासून हीच अवस्था आहे. पाणीपातळी खालावल्याने लाखो रुपयांच्या योजना मृत पडल्या. टँकरशिवाय कुठलाच पर्याय नाही. नादुरुस्त वजा बेपत्ता रस्त्यांवरून पाणी पोहचवले जात आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच अनेक गावांच्या घशाला कोरड पडली.
२० गावांमध्ये टँकर
चिखलदरा तालुक्यातील आवागड, खंडुखेडा, खोंगडा, एकझिरा, गौलखेडा बाजार, धरमडोह, बहादरपूर, आकी, नागापूर, सोमवारखेडा, मोथा, आलाडोह, लवादा, बगदरी, तोरणवाडी, तारूबांदा, रायपूर, खडीमल आदी २० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
खडीमलची अवस्था सर्वांत भीषण
खडीमल या आठशे लोकवस्तीच्या पाड्याला तीन किलोमीटर अंतरावरील नवलगाव येथील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. वीज नसल्याने सौरऊर्जा पंपावर दोन टँकर भरला जाईल एवढेच पाणी निघते. हे पाणी विहिरीत टाकल्यावर आदिवासी बादलीने ओढून नेतात. रस्ताच अत्यंत खराब असल्याने प्रशासनाला दुसरा टँकर लावता आला नाही. नजीकच्या नदी-नाल्यात झिरे खोदून पाण्याचा शोध घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात.