पोषण आहाराची डीबीटी बारगळण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:32+5:302021-07-04T04:09:32+5:30
अमरावती ; उन्हाळ्यातील सुट्टीच्या काळातील पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात (डीबीटी) मार्फत वर्ग करण्याचा निर्णय शासनाने ...
अमरावती ; उन्हाळ्यातील सुट्टीच्या काळातील पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात (डीबीटी) मार्फत वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे बँक खाते नाही. तर अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात व्यवहार नसल्याने त्यांना दंड आकारण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची शासनाची योजना बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंमलबजावणी कार्यान्वयातील शाळा स्तरावरील अडचणी समजून घेऊन आवश्यक बदल करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रात करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुवर्णमहोत्सवी, अल्पसंख्याक, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अशा विविध शिष्यवृत्तींची रक्कम जमा करण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले. बँकांनी नियमाचा हवाला देत दहा वर्षे वयोगटाच्या आतील विद्यार्थ्यांचे खाते काढलेले नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या यापूर्वी काढलेल्या खात्यात नियमित किमान सहा महिन्यांतून एकदा व्यवहार होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे खाते बंद झाले आहे. विद्यार्थ्यांच्या उघडलेल्या बँक खात्यात किमान शिल्लक नसल्याने दंड आकारणी होते. त्यामुळे ज्यावेळी कोणतीही रक्कम जमा केली जाते अशा वेळी सर्वप्रथम दंडाची आकारणी कपात केल्याने लाभार्थींचे नुकसान होणे अपेक्षित आहे. यामुळे शिक्षकांना पालकांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.
बॉक्स
गतवर्षीच्या उन्हाळ्यातील पद्धत योग्य
गतवर्षी उन्हाळी सुट्टी कालावधीचा पोषण आहार विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे शाळेतून वितरित करण्यात आला. तीच पद्धत योग्य आहे. मात्र, संदर्भित आदेशानुसार प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे सर्व संबंधित यंत्रणेसाठी अत्यंत कसरतीचे आहे. बँक व्यवस्थापनाचे विद्यार्थ्याचे खाते काढण्याबाबत नकारार्थी धोरण अधिक अडचणी वाढविणारे आहे.
बॉक्स
जमा होणारी रक्कम अत्यल्प
विद्यार्थ्यांच्या खात्यात खेळ उन्हाळी सुट्टी कालावधीतील रक्कम जमा करायची आहे. दोन महिन्यांतील अंदाजित कार्य दिवस ३५ गृहीत धरल्यास इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दरदिवशी ४ रुपये ४८ पैसे दराने एकूण केवळ १४५ रुपये ८० पैसे आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी दरदिवशी ६ रुपये ७१ रुपये दराने एकूण केवळ २३४ रुपये ८५ पैसे जमा होतील.