युरिया, डीएपीसोबत लिकिंगचा फंडा
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 7, 2024 11:40 PM2024-05-07T23:40:21+5:302024-05-07T23:40:29+5:30
महिनाभरावर खरीप : नको असलेले जोडखत मारणार शेतकऱ्यांच्या माथी.
अमरावती : यंदाचा खरीप हंगाम महिनाभरावर आल्याने बाजारात बियाणे, खतांची तयारी सुरू झाली आहे. यावेळी युरिया, डीएपी १०:२६:२६ या रासायनिक खतांसोबत कंपन्यांनी विक्रेत्यांवर जोडखतांचा (लिकिंग) मारा सुरू केला आहे. पर्यायाने विक्रेत्यांद्वारा हे खत शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे.
हंगामाच्या सुरुवातीलाच रासायनिक खत कंपन्यांद्वारा युरिया, डीएपी व १०:२६:२६ या खतांसोबत २०:२०:०:१३ किंवा सल्फर या जोडखताचा पर्याय ठेवला आहे. १० टनासोबत ५ ते १० टन जोडखत दिले जात असल्याची माहिती एका कृषी केंद्रचालकाने दिली. या जोडखताला फारसा उठाव नसल्याने विकेत्यांद्वारा साठवणूक किंवा शेतकऱ्यांना विकावे लागणार आहे. त्यामुळे नको असलेले जोडखत पर्यायाने शेतकऱ्यांनाच विकले जाणार आहे. याबाबत कृषी विभागाशी संपर्क केला असता, लिकिंगबाबत अद्याप विक्रेत्यांची तक्रार प्राप्त नाही. याबाबत कंपन्यांना पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यंदा ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होत आहे. त्यापूर्वी रोहिणीमध्ये शेतकरी पेरणीपूर्वी मशागत करतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांची लगबग वाढते. यावर्षी पाऊस समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामानविषयक संस्थांनी दिलेला आहे. बियाणे बाजारात विक्रेत्यांची तयारी सुरू झाली आहे, शिवाय जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी खरीप हंगामपूर्व आढावा घेतलेला आहे.
-----------------------
हंगामात विक्रेत्यांना जोडखतांचा पर्याय देऊ नये, यासाठी संबंधित कंपन्यांना पत्र दिलेले आहे. शिवाय निविष्ठा विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांनीदेखील जोडखत शेतकऱ्यांना विकू नये, यासाठी सूचना केल्या आहेत.
- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
------------------------
रासायनिक खतांची सद्यस्थिती (मे.टन)
युरिया :१२,७९९
एसएसपी : १२,४१६
डीएपी : ६५७४
एमओपी : २२५५
संयुक्त खते : २६,६०६
-----------------------
सद्यस्थितीत ६०,६५० मे.टन साठा उपलब्ध
१) यावर्षीच्या खरीप हंगामासाठी २,६३,२७० मे. टन रासायनिक खतांची मागणी आहे. त्यातुलनेत १,३८,४०० मे. टनाचे आवंटन आयुक्तालयाकडून मंजूर करण्यात आलेले आहे.
२) रब्बी हंगामातील ५१,७२७ मे. टन खत मार्चअखेर शिल्लक आहे. दरम्यान, १५ एप्रिलपर्यंत ८,९२३ मे. टन खतांचा पुरवठा झाल्याने सद्यस्थितीत ६०,६५० मे. टन साठा उपलब्ध आहे.
------------------------
वेळेवर पुरवठा नसल्यास वाढणार शाॅर्टेज
आयुक्तालयाने १,३८,४०० मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर केलेले आहे. मात्र त्यातुलनेत पेरणीकाळात व त्यानंतर नियमित पुरवठा न झाल्यास युरिया, डीएपी, एमओपीसह अन्य खतांचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. यापूर्वीदेखील हा प्रकार झाला होता. त्यावेळी बफर स्टॉकमधून (संरक्षित साठा) पुरवठा करण्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती.