शुध्दीपत्रकांच्या माऱ्यामुळे स्वच्छता कंत्राटासाठी लिमिटेड कॉम्पिटिशन!
By प्रदीप भाकरे | Published: April 13, 2023 05:24 PM2023-04-13T17:24:03+5:302023-04-13T17:29:01+5:30
केवळ १८ निविदा : ‘लोकलला प्राधान्य’च्या अटीने बड्या संस्था दूर
अमरावती : बहुचर्चित झोननिहाय स्वच्छता कंत्राटासाठी महापालिका प्रशासनाकडे एकूण १८ निविदा प्राप्त झाल्या आहेत. सुमारे १४० कोटींचे हे झोननिहाय कंत्राट घे्ण्यासाठी देशभरातील बड्या संस्था समोर येतील, १० कोटींची उलाढाल मागितल्याने अनेक बडे निविदाधारक स्पर्धेत उतरतील, असा प्रशासनाचा होरा होता. मात्र प्रत्यक्षात १२ एप्रिल या निविदा अपलोड करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८ निविदा आल्या आहेत. ३ मार्च रोजी काढलेल्या या निविदा प्रक्रियेदरम्यान शुध्दीपत्रकांचा मारा झाल्याने की काय, या कंत्राटासाठी फारशा संस्था समोर आल्या नसाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सन २०१८ च्या प्रभाग व बाजार मिळून असलेल्या २३ कंत्राटांंना बायबाय करत प्रशासनाने यंदा प्रथमच ते प्रभागनिहाय कंंत्राट झोननिहाय एक असे पाचच द्यायचे, असा निर्णय घेतला. २३ एैवजी पाच कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होईल, असा त्यामागील होरा होता.
सबब, ३ मार्च रोजी पाच झोनसाठी स्वतंत्र अटी शर्ती असलेल्या पाच निविदा काढण्यात आल्या. त्यादरम्यान २१ मार्च रोजी १७ मुद्द्यांचा समावेश असलेले शुध्दीपत्रक काढण्यात आले. त्या शुध्दीपत्रकानुसार इच्छुकांना निविदा भरता याव्यात, यासाठी प्रक्रियेला ६ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज असताना ५ एप्रिल रोजी सायंकाळी पुन्हा एकदा शुध्दीपत्रकासह निविदा प्रक्रियेला १२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यादरम्यान आलेल्या १८ निविदा आता १७ एप्रिल रोजी उघडल्या जातील. आधी टेक्निकल बिड उघडले जाईल. छाननी होईल. तांत्रिक छाननीदरम्यान १८ निविदांपैकी किती जण गळतात, यावर फायनान्शियल बिडचे भविष्य असेल.
त्यांना दोन झोन, स्थानिकांना प्राधान्य
ज्या संस्थेची तीन वर्षातील उलाढाल १० कोटींपेक्षा अधिक असेल, त्यांना दोन झोनचे कंत्राट देण्यात येतील, असा बदल २१ मार्चच्या शुध्दीपत्रकानुसार करण्यात आला. तर ५ एप्रिल रोजी काढलेल्या शुध्दीपत्रकानुसार, निविदेत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांच्या/ सेवा सहकारी संस्था पात्र होत असल्यास त्यांनाच स्वच्छता कंत्राट देण्यात येणार आहे.
अशा आल्या निविदा
१२ एप्रिलपर्यंत रामपुरी कॅम्प, राजापेठ व बडनेरा झोनसाठी प्रत्येकी तीन, तर दस्तुरनगर झोनचे स्वच्छता कंत्राट मिळविण्यासाठी पाच निविदा आल्या आहेत. तर, भाजीबाजार झोनचे कंत्राट मिळविण्यासाठी चार निविदांधारकांमध्ये स्पर्धा असेल. दस्तुरनगर झोनचे कंत्राट मिळविण्यासाठी पाच जण सरसावल्याने तेथे कुण्या स्थानिकाचा नंबर लागतो, हे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात स्पष्ट होईल.