धावत्या रेल्वेत मिळेल आॅनलाईन चालान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:29 AM2019-08-04T01:29:07+5:302019-08-04T01:29:32+5:30
धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट निरीक्षकांकडील पावती बुक बंद होऊन त्याऐवजी रेल्वे प्रशासनाने आॅनलाईन चालान ही प्रणाली विकसित केली आहे. स्वयंचलित हँडलद्वारे दंडाची रक्कम, अतिरिक्त तिकीटदेखील प्रवाशांना मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट निरीक्षकांकडील पावती बुक बंद होऊन त्याऐवजी रेल्वे प्रशासनाने आॅनलाईन चालान ही प्रणाली विकसित केली आहे. स्वयंचलित हँडलद्वारे दंडाची रक्कम, अतिरिक्त तिकीटदेखील प्रवाशांना मिळणार आहे. आॅनलाईनसोबतच रेल्वेने कॅशलेस व्यवहाराची कास याद्वारे धरली आहे.
रेल्वेत गाड्यांमध्ये विनातिकीट प्रवासी आढळल्यास त्याच्याकडून दंडाची रक्कम अथवा मेमो तयार करण्यासाठी तिकीट निरीक्षकांकडे पावती बुक असते. मात्र, येत्या काळात तिकीट निरीक्षकांकडील कारभार आॅनलाईन केला जाणार आहे. धावत्या गाडीत दंडाची रक्कम अथवा चलान तयार करण्यासाठी आॅनलाइन प्रणाली वापरावी लागणार आहे. त्याकरिता रेल्वेने अद्ययावत स्वयंचलित हॅण्डल मशीन वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही मशीन सर्व कामकाज आॅनलाईन करण्यासाठी मदत करेल. त्यामुळे तिकीट निरिक्षकांचे लिखित कामांना आणि प्रवाशांच्या घासाघिशीला ‘ब्रेक’ लागणार आहेत. धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये धावते पथक किंवा तिकीट निरीक्षकांकडे ही व्यवस्था असणार आहे. दंडाची रक्कम आणि चलान तयार करण्यासाठी तिकीट निरीक्षकांचा वेळ वाचेल. या प्रणालीतून रेल्वेला पारदर्शक कारभाराची मुहूर्तमेढ रोवण्याची चिन्हे आहेत. भुसावळ मध्य रेल्वे विभागात ही प्रणाली लवकरच सुरू होणार आहे. त्याकरिता तिकीट निरीक्षकांना टप्प्याटप्याने प्रशिक्षण दिले जाणार आसल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.
आॅनलाईन जनरल तिकीटची सुविधा
रेल्वे प्रशासनाने कॅशलेस व्यवहारावर भर दिला आहे. त्याअनुषंगाने रेल्वे स्थानकाच्या ५ किमी अंतरापासून दूर असल्यास प्रवाशांना यूटीएस अॅपद्वारे आॅनलाईन जनरल तिकीट घेता येणार आहे. ही सुविधा सुरू झाली आहे तसेच यूटीआय, पॉस मशीन, क्रेडिट कार्डचा वापरसुद्धा करता येणार आहे. वेळेची बचत आणि पारदर्शक कारभारासाठी आॅनलाइन सुविधांवर भर दिला जात आहे. आॅनलाइन कारभाराविषयी भुसावळ येथे दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली आहे.