पंढरपूरच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील बहिरममध्ये रंगले माऊलीचे रिंगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:07 AM2018-01-08T10:07:41+5:302018-01-08T10:08:00+5:30
विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी झालेल्या रिंगण सोहळ्यात गर्दीने नवा उच्चांक गाठला. पंढरपूरच्या वारीत वाखरी येथे रिंगण सोहळ्यात धावणारे शिंतोळे महाराज यांचे अश्व व बहिमरबुवाची पालखी प्रथमच बहिरम येथे काढण्यात आली.
सुमित हरकुट।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी झालेल्या रिंगण सोहळ्यात गर्दीने नवा उच्चांक गाठला. पंढरपूरच्या वारीत वाखरी येथे रिंगण सोहळ्यात धावणारे शिंतोळे महाराज यांचे अश्व व बहिमरबुवाची पालखी प्रथमच बहिरम येथे काढण्यात आली. यानिमित्ताने प्रबोधनाचा नवा अध्याय लिहिला गेला.
गतवर्षीपासून यात्रेदरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. ६ ते १३ जानेवरीदरम्यान वारकºयांनी भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. रविवार ७ जानेवारीला ‘माऊलीचा रिंगण’ सोहळा येथे रंगला. यात्रेतील शंकर पटाच्या जागेवर दुपारी २ वाजता या रिंगण सोहळ्याकरिता तयार करण्यात आलेल्या पाच एकर जागेवर विठ्ठलाच्या वारीतील वाखरी येथे रिंगणात धावणारे कर्नाटकच्या शिंतोळे सरकार यांचे माऊलीचे अश्व बहिरम धावले. अश्वांनी तीन रिंगण पूर्ण केल्यावर पावलांना पावन झालेली माती भक्तांनी आपल्या भाळी लावताच बहिरमबुवाचा जयघोष आसमंतात पसरला.
या रिंगण सोहळ्याला आळंदी येथील महाराजांच्या पादुका, भक्तीधाम येथील गुलाबराव महाराजांच्या पादुका, बहिरमबाबांच्या पादुका, गुणवंतबाबांच्या पादुकांच्या पालखी आणण्यात आल्या होत्या. या रिंगण सोहळ्या दरम्यान बहिरमबाबा संस्थांचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी तसेच इतर पदाधिकारी, चांदूर बाजार उपसभापती नितीन टाकरखेडे उपस्थित होते.
बहिरम शंकराच्या कुळातील लोकदेव
अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात सातपुडा पर्वताच्या शिखरावर विराजमान बहिरमबुवा अनेकांचे कुलदैवत आहे. जागृत शक्तिपीठ, सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान, पौराणिक महात्म्य लाभलेले लोकदैवत असलेले बहिरमबुवा म्हणजे भैरवनाथ. भगवान शंकराच्या परिवारातील अष्टभैरवा पैकी एक लोकदेव म्हणून त्यांची ओळख आहे.
सर्वाधिक काळ चालणारी यात्रा
बहिरम येथील प्रसिद्ध यात्रा महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ चालणारी आहे. २० डिसेंबरला विधिवत पूजनाने सुरू होणारी यात्रा २० जानेवारीला समाप्त होते, तर ३१ जानेवारीपर्यंत ती पुरते. पूर्वी दोन वेळा व दहा दिवस भरणारी यात्रा आता वर्षातून एकदाच मात्र महिनाभर असते. तिथीवर भरणारी यात्रा आता तारखेवर आली आहे.