सिंह तारकासमूहात होणार उल्कावर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 09:31 PM2018-11-10T21:31:57+5:302018-11-10T21:32:18+5:30
अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करताना अचानक एखादी प्रकाशरेखा आकाशात लखलखताना दिसते अन् क्षणात गायब होते. हा उल्का वर्षावाचा प्रकार आहे. १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान सिंह तारकासमूहात मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. हा उल्का वर्षाव अवलोकण्याची पर्वणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करताना अचानक एखादी प्रकाशरेखा आकाशात लखलखताना दिसते अन् क्षणात गायब होते. हा उल्का वर्षावाचा प्रकार आहे. १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान सिंह तारकासमूहात मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. हा उल्का वर्षाव अवलोकण्याची पर्वणी आहे.
या उल्का वर्षावाचे ‘लिओनिड्स’ असे नाव आहे. आपल्याकडे याला तारा तुटणे म्हणतात. मात्र, तारा हा कधी तुटत नसतो. तो उल्का वर्षावाचा प्रकार आहे. याची वेळ व तारीख निश्चित नसते. त्यामुळे निरीक्षणाची तयारी असणाºयांनीच उल्का वर्षाव पाहण्याचा प्रयत्न करावा. घराबाहेत पडलो अन् भराभर उल्का पडताना दिसल्या, अशा अवास्तव कल्पना करू नये. उल्कांचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणाच्या शास्त्रीय नोंदी, याची खगोल जगतात खूप गरजेचे आहे.
ज्यावेळी एखादी उल्का आपल्याला पडताना दिसते. या संदर्भात लोकांच्या खूप अंधश्रद्धा आहे. परंतू, अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कुठेच आधार नाही. सिंह तारकासमूहातून होणारा हा उल्का वर्षाव ‘टेम्पटटल’ या धुमकेतूच्या अवशेषांमुळे होतो. हा धूमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो. हा उल्का वर्षाव अगदी साध्या डोळ्यांनी आपल्याला मध्यरात्रीनंतर घराच्या गच्चीवरून किंवा अंधारातून पाहता येतो. सर्व खगोलप्रमींनी व जिज्ञासूंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर, प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.
पृथ्वीवर येते ती ‘अशणी’
धूमकेतू पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असताना त्यातील काही भाग मोकळा होतो. हे त्याने मागे टाकलेले अवशेष असतात. या उल्का एखाद्या तारकासमूहात येत आहेत, असे वाटते. तासाला ६० किंवा त्याहून अधिक उल्का आकाशातील एखाद्या भागातून पडत असतील तर त्यास ‘उल्का वर्षाव’ म्हणतात. काही वेळा गतिमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना त्या घनरूप अवस्थेत पृथ्वीवर येतात. तेव्हा त्यास ‘अशणी’ असे म्हणतात. उल्काशास्त्रात याला महत्त्वाचे स्थान आहे. बाह्य अवकाशातील वस्तूंचे नमुने या अशणीमुळेच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्या जडणघडणीचा अर्थ आपल्याला लावता येतो.