पाण्याच्या बाटलीत दारु!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:32+5:30
गावठी दारु मिळविण्याकरिता काही जण आपल्या सवंगड्याकरिताही प्लास्टिक बॉटलची खेप आणत आहेत. मध्य प्रदेशातून ही गावठी दारू आडमार्गाने राज्यात दाखल होत आहे. याकरिता एक खास यंत्रणा त्यांनी उभारली आहे. रस्ता पुढे क्लीअर आहे, धोका नाही, हे सांगण्याकरिता सीमावर्ती गावात त्यांनी आपले स्वयंसेवक ठेवले आहे. माहिती देणाऱ्या या स्वयंसेवकास एक मोटरसायकलमागे शंभर रुपये टीप मिळते.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : हातभट्टीची गावठी मोहाची दारू आता पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बॉटलमध्ये विकली जात आहे. दारूची ही बॉटल चारशे रुपयांना मिळत आहे. लॉकडाऊनमुळे या प्लास्टिक बॉटलची मागणी वाढली आहे. विदेशीवाले देशीवरून या गावठीवर आले आहे. डबकी, पावटी, बंफर, शिशा हे प्रचलित शब्द मागे पडले आहेत.
गावठी दारु मिळविण्याकरिता काही जण आपल्या सवंगड्याकरिताही प्लास्टिक बॉटलची खेप आणत आहेत. मध्य प्रदेशातून ही गावठी दारू आडमार्गाने राज्यात दाखल होत आहे. याकरिता एक खास यंत्रणा त्यांनी उभारली आहे. रस्ता पुढे क्लीअर आहे, धोका नाही, हे सांगण्याकरिता सीमावर्ती गावात त्यांनी आपले स्वयंसेवक ठेवले आहे. माहिती देणाऱ्या या स्वयंसेवकास एक मोटरसायकलमागे शंभर रुपये टीप मिळते. राज्यातील मद्यपींची इच्छातृप्ती मध्यप्रदेशातीलही दारू करीत आहे. अचलपूर राजस्व उपविभागात असलेल्या अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्याचा सीमावर्ती भाग हा मध्यप्रदेश राज्याला लागून आहे. याचाच फायदा हे मद्यपी आणि मद्यविक्री करणारे उचलत आहेत. पोलीस दारू पकडत आहे. गावठी दारू व मोहाचा सडवा नष्ट करण्याची मोहीम जोरदार राबविली जात आहे. तरीदेखील गावठी दारूसह मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुही शहरांमध्ये दाखल होत आहे. स्थानिक पोलीस धाडी टाकत असले, तरी हातभट्टीला अटकाव बसू शकला नाही.
मद्यपींची निराशा
दारूची दुकाने उघडणार म्हणून शहरात सोमवारी सकाळपासूनच या दुकानांसमोर मद्यपींनी रांगा लावल्या होत्या. मद्यविक्री करणाºया दुकानदारांनी फिजिकल डिस्टन्सिंगची सोयही करुन ठेवली होती. अगदी शहाण्यासारखे ते पाळत आणि तोंडाला मास्क लावून अनेक मद्यपी रांगेत उभे राहलेत. दुकानदारांनी बॅरिकेड बांधण्याकरिता बासे, बल्ल्यांसह मजूरही सांगून ठेवले होते. प्रशासनाची नाराजी नको म्हणून दोघेही संयम पाळून होते. पण, ही दुकाने उघडलीच नाहीत. त्यामुळे मद्यपींची घोर निराशा झाली. मद्याकरिता रांगेत लागलेल्या काहींनी तर दुपट्ट्याने आपले पूर्ण तोंड बांधून ओळख लपविण्याचा प्रयत्नही यादरम्यान केला.
जागेवर भाव कमी
राज्याच्या सीमेला लागून असलेल्या भागात, जागेवर हातभट्टीच्या गावठी दारू कमी किमतीला मिळते. येथे पाण्याच्या एक लिटरच्या बॉटल स्वरूपात दारू केवळ शंभर ते दीडशे रुपयांना मिळते. शंभर ते दीडशे रुपयांची ही बिसलरी गरजूला चारशे रुपयापर्यंत विकली जाते.
दुधाच्या कॅनमधून वाहतूक
हातभट्टीच्या गावठी दारूची वाहतूक, तस्करी दुधाच्या कॅनमधून केली जात आहे. खाली अर्धा भागात बिसलरी आणि वर दूध, कधी पूर्ण कॅनमध्ये भरून या दारूच्या बॉटलची वाहतूक केली जाते.