काटकुंभमध्ये पकडलेला दहा लाखांचा दारूसाठा ‘बोगस’, आंतरराज्य टोळी सहभागी असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 12:19 PM2023-06-14T12:19:18+5:302023-06-14T12:20:31+5:30
उत्पादकाकडून शिक्कामोर्तब
चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील काटकुंभ येथे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका घरावर धाड टाकून पकडलेली दहा लाख रुपयांची देशी-विदेशी दारू बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील फरार आरोपी प्रमोद मालवीय याला सोमवारी सापळा रचून अटक करण्यात आली. बनावट दारू विक्रीमध्ये आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ९ जून रोजी काटकुंभ येथील एका घरातून देशी व विदेशी दारूचे एकूण २०० बॉक्स ताब्यात घेतले होते. या प्रकरणात आरोपी विनोद शंकरलाल मालवीय (४८, रा. काटकुंभ) याला अटक केली तर त्याचा भाऊ प्रमोद शंकरलाल मालवीय (४५) हा फरार झाला होता. जामिनासाठी न्यायालयात येण्यापूर्वीच सोमवारी त्याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान ती संपूर्ण दारू बनावटी असल्याचे निषन्न झाले. सबब, दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करण्यात आली. तो दारूसाठा कोठे तयार करण्यात आला, या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे, अशा प्रकारची दारू आणखी कुठे वितरित करण्यात आली आहे का, या बाबींचा तपास पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे व एलसीबी करीत आहे.
साखर कारखान्यातून आला बनावटचा अहवाल
तो दारू साठा बनावट की कसे, याबाबत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शिंगणापूर (जि. अहमदनगर) व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अहवाल मागविण्यात आला. ती दारू आपल्या कारखान्यात तयार झाली नसून बॉटलची सिलिंग व लेबलिंग बनावट आहे. जप्त दारूमधील केमिकल हे सुद्धा आपल्या कारखान्यात वापरण्यात येत नसून बॉटलवर देण्यात आलेले बॅच नंबर सुद्धा बनावटी असल्याचा अहवाल तेथील साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांनी दिला आहे.
मध्य प्रदेशात मोठे रॅकेट?
या बनावट दारू प्रकरणाचा संबंध मध्य प्रदेशाशी जोडण्यात आला आहे. प्रमोद मालवीय हा तेथून माल आणून येथे बनावट दारूची विक्री करीत होता का, या दिशेने पोलिस तपास करत आहेत. हा सर्व प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहीत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. एलसीबीने काटकुंभ येथून ९.८० लाखांची देशी व ३८,८०० रुपयांची विदेशी दारू जप्त केली होती.