‘लिस्ट आॅफ फाईव्ह’वर आज शिक्कामोर्तब !
By admin | Published: March 8, 2016 12:10 AM2016-03-08T00:10:04+5:302016-03-08T00:10:04+5:30
सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रावर महापालिकेची टुमदार प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे.
१६ मध्ये ‘टशन’ : महापालिका प्रशासकीय इमारत बांधकाम
अमरावती : सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रावर महापालिकेची टुमदार प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. ५० ते ६० कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेल्या या इमारतीचे काम कोणत्या फर्मकडे जाईल, याबाबतचे सेमीफायनल मंगळवारी अपेक्षित आहे. १६ फर्मपैकी ‘लिस्ट आॅफ बेस्ट फाईव्ह’वर परीक्षक समिती शिक्कामोर्तब करणार आहे. पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी १६ फर्ममध्ये ‘टशन’ आहे.
महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी गत आठवड्यात देशभरातील विविध १६ बांधकाम आराखड्याचे सादरीकरण केले. त्यातील उत्कृष्ट पाच आराखडे सादर करणाऱ्यांना पुन्हा बोलावण्यात येणार आहे. १६ पैकी ५ संस्था निवडण्यासाठी परीक्षण समितीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही समिती मंगळवार ८ मार्चला पाच फर्मची अंतिम यादी देणार असल्याचे संकेत आहेत. त्या पाचपैकी अति उत्कृष्ट आराखडा असणाऱ्या फर्मची पालिकेच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी निवड होणे अपेक्षित आहे. ही नवीन इमारत आयुक्तांच्या बंगल्याच्या जागेवर प्रस्तावित आहे. त्यासाठी दोन एफएसआय (चटई क्षेत्र) वापरले जाणार आहे.
१७ पैकी १६ फर्मकडून पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन करण्यात आले. त्या सादरीकरणाचे (४) घटकांवर विश्लेषण आणि अभ्यास होणार आहे. यात महापालिकेच्या नव्या इमारतीत विभागाचे नियोजन कसे केले, पदाधिकाऱ्यांचे कार्यालयासाठी इमारतीच्या आतील जागा, वाजवी दर आणि इमारत बांधकामासाठी कुठली पद्धत वापरल्या जाणार आहे. या सर्व मुद्यांचे सुक्ष्म अवलोकन करून परिक्षण समिती १६ पैकी ५ फर्मच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करणार आहे. ५ फर्म निवडताना त्यांचा मागील कार्यानुभाव, पतसुद्धा विचारात घेतली जाणार आहे.
प्रशासकीय इमारत बांधण्यास इच्छूक असलेले आर्किटेक्ट
शैलेश कोल्हे (अमरावती), देवरे- धामणे (नाशिक), मोहन खडसे (नोएडा), जयंत कोलते (नाशिक), आकाश मोहता (अमरावती), प्रकाश टाले अॅन्ड असोसिएशन (नवी दिल्ली), स्केअर ९ डिझाईन (नागपूर), आलिया कन्सल्टंसी (मुंबई), सुशील खंडारकर (अमरावती), श्रीफर्म (गट्टाणी, अमरावती), संक्रमण डिझाईन स्टुडिओ (बांद्रा, मुंबई), ध्रुव कन्सल्टंसी सर्व्हीस (बेलापूर, नवी मुंबई), जेनेसिस फर्म, शैलेंद्र देशमुख (अमरावती), एबी प्रोजेक्ट (वर्धा), विश्वास सिसोदिया (मुंबई) आणि यशश्री क्रिएशन (नाशिक) यापैकी १६ फर्मकडून पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन ३ व ४ मार्चला करण्यात आले. यापैकी सुशील खंडारकर यांच्याकडून कुणीही उपस्थित नव्हते.
परीक्षण समितीत कोण ?
१६ फर्मपैकी ज्या फर्मनी उत्कृष्ट सादरीकरण केले, ज्यांचा प्लॅन अत्युच्च आहे. त्यातील पाच फर्मची निवड करण्याची जबाबदारी परिक्षण समितीवर आहे. यात महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, नगर रचना विभागाचे सु. ना. कांबळे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील लांडे व गुल्हाने, पोटे आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख, महापालिकेचे मुख्य लेखापाल आणि पालिकेच्या वकिलांचा समावेश आहे.
१७ निविदा प्राप्त
अमरावती महापालिकेच्या प्रशासकीय इमारत योग्य जागी स्थलांतरित करून पुनर्बांधणी करणे, यासाठी १० आॅक्टोबर १५ ला निविदा प्रसिद्ध करण्यात आली यासाठी १७ फर्म/ व्यक्तींकडून निविदा प्राप्त झाल्यात.