‘सुसाईड स्पॉट’ विहिरींची यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:44 PM2018-06-18T23:44:07+5:302018-06-18T23:44:20+5:30
सार्वजनिक ठिकाणी व नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या विहिरींची यादी तयार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी सर्व पोलीस ठाण्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सार्वजनिक ठिकाणी व नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या विहिरींची यादी तयार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी सर्व पोलीस ठाण्यांना दिले. शीतल पाटील यांची हत्या करून त्यांचा मृतदेह एक्सप्रेस हायवेलगतच्या विहिरीत फेकण्यात आला होता. रविवारी त्याच विहिरीत आणखी एका इसमाने आत्महत्या केली. या घटनांच्या अनुंषगाने ही विहीर सुसाइड स्पॉट बनल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले.
शीतल पाटील हत्याकांडानंतर शेतमालकास नोटीस बजावून विहिरीवर जाळी बसविण्यासाठी किंवा बुजविण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, शेतमालकाने त्याची दखल घेतली नाही. विहिरीजवळच अनेकदा प्रेमीयुगुल आढळले असून, काही वर्षांपूर्वी त्याच परिसरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्याच विहिरीत यापूर्वी तीन ते चार आत्महत्यांच्या घटना उघडकीस आल्या. विहिरीजवळील एका खोलीत आढळलेल्या आक्षेपार्ह साहित्यावरून त्याठिकाणी देह विक्रीचा व्यवसायसुद्धा चालत असल्याची चर्चा आहे. मोकळ्या जागेत ही विहीर असल्याने कुणीही रागाच्या भरात आत्महत्येसाठी हाच स्पॉट निवडत आहेत. अशाप्रकारच्या अप्रिय घटना घडल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी सोमवारी सर्व ठाण्यांना सूचना देऊन त्यांच्या हद्दीतील सार्वजनिक विहिरी, वापरात नसलेल्या विहिरी व निर्जनस्थळावरील विहिरींची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहे.
सार्वजनिक, निर्जनस्थळावरील विहिरींची यादी बनविण्याचे निर्देश ठाणेदारांना दिले आहे. या विहिरी धोकादायक ठरत असल्यामुळे त्यावर जाळ्या बसवाव्यात किंवा त्या बुजवून टाकाव्यात, याबाबत संबंधित विहीरमालकास नोटीस बजावण्यात येईल.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त