स्थानिक सूत्रधार ‘अंडरग्राऊंड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 05:00 AM2021-08-02T05:00:00+5:302021-08-02T05:01:01+5:30
हवालाचे स्थानिक सूत्रधार ‘अंडरग्राऊंड’ झाले आहेत. २७ जुलै रोजी राजापेठ पोलिसांनी फरशी स्टॉप भागातून ताब्यात घेतलेल्या दोन महागड्या व एकाच रंगाच्या चारचाकी वाहनांमधून तब्बल ३.५० कोटी रुपये जप्त केले. जप्ती ते मोजदाद व्हाया पंचनामा अशी सलग नऊ तास ही मेगा कारवाई चालली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या अगदी पहाटेपासून या जम्बो कारवाईवर लक्ष ठेवून होत्या.
प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: राजापेठ पोलिसांनी ३ कोटी ५० लाखांच्या हवाला रक्कम प्रकरणात स्थानिक सूत्रधारांचा तपास चालविला आहे. स्थानिकांच्या सहभागाशिवाय एवढ्या मोठ्या रकमेची वाहतूक, भरणा शक्यच नसल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस यंत्रणा पोहोचली. दरम्यान, न्यायालयाने तपासाची परवानगी दिल्याने राजापेठ पोलीस आता हवाला प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार आहे. सबब, हवालाचे स्थानिक सूत्रधार ‘अंडरग्राऊंड’ झाले आहेत.
२७ जुलै रोजी राजापेठ पोलिसांनी फरशी स्टॉप भागातून ताब्यात घेतलेल्या दोन महागड्या व एकाच रंगाच्या चारचाकी वाहनांमधून तब्बल ३.५० कोटी रुपये जप्त केले. जप्ती ते मोजदाद व्हाया पंचनामा अशी सलग नऊ तास ही मेगा कारवाई चालली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या अगदी पहाटेपासून या जम्बो कारवाईवर लक्ष ठेवून होत्या.
३.५ कोटींसह चार चालकांना ताब्यात घेतल्यानंतर सकाळी ८.३० च्या सुमारास राजापेठ पोलिसांनी फरशी स्टॉप परिसरातील अपार्टमेंटमधील एका फ्लॅटची झाडाझडती घेतली. जेथून रक्कम वाहनात भरण्यात आली, तेथून नीलेश भरतभाई पटेल (२७, ह.मु. फरशी स्टॉप, मूळ रा. सांचल, ता. जि. मैसाणा, गुजरात) व जिग्नेश राजेश गिरीगोसावी (२६, रा. मैसाणा) यांना अटक करण्यात आली. त्या फ्लॅटमधून १.५० लाख रुपये रोख व दोन मनी काऊंटिंग मशीन जप्त करण्यात आल्या. ती संपूर्ण रक्कम आपण अमरावतीतूनच भरल्याची कबुली चालकांसह त्या दोघांनीदेखील दिली. या संपूर्ण कालावधीत ताब्यात घेतलेल्या सहाही जणांनी पोलिसांना फारसे सहकार्य केले नाही. अगदी त्याच दिवशी प्रकरणाचे स्ट्रॉंग गुजरात कनेक्क्शन उघड झाले. पाठोपाठ हैदराबाद पोलिसांनी विचारणा केली. मात्र, या प्रकरणातील स्थानिक पाठराखे पडद्याआड राहिले. से दाखल केल्यानंतर पोलिसांची पुढील भूमिका ठरणार आहे.
प्रकरण न्यायालयात
अहमदाबाद स्थित नीना शहा यांनी ती रक्कम आपली असल्याचा दावा सीए, वकिलाकरवी केला. तिसऱ्या दिवशी हे प्रकरण स्थानिक न्यायालयात पोहोचले. ताब्यातील सहा जण चौकशीला सहकार्य करीत नसल्याने सखोल चौकशीशिवाय संबंधित कंपनीला ती रक्कम परत करू नये, असा अर्ज आयकर विभागाने न्यायालयात दाखल केला. पोलिसांचा अर्ज स्वीकारून ४ ऑगस्ट रोजी ‘से’ दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
‘से’ दाखल केल्यानंतर ठरेल तपासाची दिशा
याप्रकरणात ‘से’ दाखल करण्यापुर्वी पोलिसांनादेखील आपली बाजू भक्कम करावयाची आहे. चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्या सहा जणांनी पैसा येथूनच भरला, मुंबई, औरंगाबाद जात होता, एवढीच कबुली दिली. मात्र, त्यापुढील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तपासाला परवानगी मिळाल्याने आता पोलीस त्या सहा जणांचे मोबाईल सीडीआर, स्थानिक संबंध व एकूणच प्रकरणाच्या तळाशी जाणार आहेत.
न्यायालयाने तपासाची परवानगी दिली आहे. ‘से’ दाखल करावयाचा आहे. रक्कम वैध होती, तर दडवून का नेत होते, हा आमचा प्रश्न असेल.
- मनीष ठाकरे
ठाणेदार, राजापेठ