केशव कॉलनीसह तीन वाईन शॉपला टाळे
By admin | Published: April 28, 2017 12:15 AM2017-04-28T00:15:08+5:302017-04-28T00:15:08+5:30
जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या धडाकेबाज निर्णयानुसार केशव कॉलनीतील आनंद लिकर्ससह
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : १३ देशी दारू दुकानांना सील, शहरात खळबळ, नागरिक आनंदले
अमरावती : जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या धडाकेबाज निर्णयानुसार केशव कॉलनीतील आनंद लिकर्ससह शहरातील इतर तीन वाईन शॉप आणि १३ देशी दारू विक्री दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री सील केलीत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर शहरभरातील त्रस्त महिला व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने शहरातील १८ दुकाने स्थलांतरित करण्याचा अहवाल दिल्यामुळे या कारवाईला निर्णायक रूप प्राप्त झाले.
केशव कॉलनी परिसरातील आनंद भामोरे यांच्या वाईन शॉपनजीक वर्षानुवर्षे असह्य गुंडगिरीचा त्रास नागरिकांनी सहन केला. नागरिकांच्या तक्रारींनंतर ‘लोकमत’ने या अन्यायाविरुद्ध वारंवार आवाज बुलंद केला.
‘लोकमत’चे यश, अभिनंदनाचा वर्षाव
जेथे अन्याय, तेथे ‘लोकमत’ या भूमिकेतून केशव कॉलनीतील नागरिकांनी पुकारलेल्या लढ्याला ‘लोकमत’ने नीडरपणे सातत्यपूर्ण बळ दिले. दबाव वा प्रलोभनाला कधीही न जुमानणाऱ्या सामान्यांच्या ‘लोकमत’ने सामान्यांचा लढा उचलून धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी ‘लोकमत’ची दखल घेतली आणि दारू दुकानांना सील ठोकले गेले. त्यामुळेच कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी ‘लोकमतचे खासे आभार मानले. लोकमतवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.