बारावीच्या भाषा परीक्षेवर ‘लॉकटडाऊन’चे सावट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:00+5:302021-04-09T04:14:00+5:30
अमरावती : उन्हाळी इयत्ता बारावीच्या परीक्षांना २३ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मात्र, राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन असून शनिवार, ...
अमरावती : उन्हाळी इयत्ता बारावीच्या परीक्षांना २३ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मात्र, राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन असून शनिवार, रविवार असे दोन दिवस विकेन्ड आहे. त्यामुळे २४ एप्रिल रोजी होणारा भाषा परीक्षेचा पेपर पुढे ढकलण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून होऊ घातली आहे. कोरोना संसर्गाच्या विळख्यात या परीक्षांचे नियोजन करताना प्रवेशित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये परीक्षा केंद्र राहतील, असा निर्णय झाला आहे. त्यानुसार अमरावती विभागात पहिल्यांदाच २८३० केंद्रावर बोर्डाने परीक्षा घेण्याची तयारी चालविली आहे. शिक्षण मंडळाने कोविड -१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी चालविली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी बोर्डाने सर्व स्तरावर तयारी केली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवार असे दोन दिवस विद्यार्थ्यांना बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे शनिवार २४ एप्रिल रोजी होणारा बारावीचा भाषा पेपर पुढे ढकलण्याची दाट शक्यता आहे. त्याकरिता माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांनी भाषा पेपर पुढे ढकलावा, अशी मागणी केली आहे. बारावीच्या २४ एप्रिल रोजीच्या भाषा पेपर संदर्भात काही बदल होणार का? याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्या क्वारंटाईन असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
--------------------
विभागात परीक्षार्थी संख्या
दहावी : १,६४, ६३२
बारावी : १,३७, ५६९
--------------------
दहावी परीक्षेसाठी २५३३ केंद्र
विभागात दहावीच्या एकूण २६६८ शाळा असल्याची नोंद आहे. अगोदर दहावीच्या परीक्षेसाठी ७१६ केंद्र होते. मात्र, यंदा २५३६ परीक्षा केंद्र असतील. दहावीसाठी एकूण १८२० केंद्र वाढले आहेत. १३२ शाळांना विद्यार्थी संख्या अथवा तांत्रिक कारणांनी परीक्षा केंद्रापासून डच्चू देण्यात आला आहे.
----------------------
बारावीचे १५१४ परीक्षा केंद्र
अमरावती विभागात बारावीच्या एकूण १५७२ शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यापैकी १५१४ शाळांमध्ये परीक्षा केंद्र असणार आहे. अगोदर बारावीचे ५०४ केंद्र होते. यंदा १०१० परीक्षा केंद्र वाढले आहेत. बारावी परीक्षा केंद्रापासून ५८ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना वंचित ठेवण्यात आले आहे.
---------------