संचारबंदीत सीसीटीव्हीची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:00 AM2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:13+5:30
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता सद्यस्थितीत तालुक्यात पोलीस व नगरपंचायत प्रशासनाचे कर्मचारी यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. परंतु, दोन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने शहरातील सर्वच ठिकाणी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाला संचारबंदीत गर्दी व अकारण फिरणाऱ्यांवर ते नियंत्रण मिळवणे शक्य नव्हते.
पंकज लायदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तोकड्या मनुष्यबळातही अहोरात्र काम करणाऱ्या खाकी वर्दीवाल्यांना आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची साथ मिळणार आहे. नगरपंचायत प्राशासनाने पुढाकार घेऊन शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गावरील आंतरराज्यीय व जिल्ह्याकडे जाणाऱ्या सीमांच्या तपासणी नाक्यासह मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सकाळी ८ ते १२ या वेळेत गर्दी करणाऱ्यांवर व अकारण फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्याकरिता ‘खाकी’ला आता सीसीटीव्हीची साथ मिळणार आहे
धारणी तालुक्याच्या ठिकाणाहून अवघ्या १६ किमी अंतरावर मध्य प्रदेशची सीमा आहे. या सीमाभागात मध्यप्रदेशात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. धारणी तालुक्यातील अनेक नागरिक कामकाजाकरिता तेथे जाट असतात. त्यांच्याकरिता सीमाबंदी केली असली तरिसुधा नागरिक संधि मिळताच मार्ग काढतात. आता ३ मेपर्यंत सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता सद्यस्थितीत तालुक्यात पोलीस व नगरपंचायत प्रशासनाचे कर्मचारी यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. परंतु, दोन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने शहरातील सर्वच ठिकाणी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाला संचारबंदीत गर्दी व अकारण फिरणाऱ्यांवर ते नियंत्रण मिळवणे शक्य नव्हते. त्यामुळे नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन अमरावती, धारणी, बऱ्हाणपूर, इंदूर या मुख्य महामार्गाने जाणाऱ्या आंतरराज्यीय व जिल्ह्याच्या सीमा असलेल्या ढाकणा फाटाजवळील वनविभाग तपासणी नाक्यासह बस स्थानक परिसर, दयाराम चौक, चर्च रोड, भारतीय स्टेट बैंक, होली चौक, जयस्तंभ चौक, दाना मार्केट येथील आठवडी बाजार या १० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. शहरातील अकारण फिरणारे व गर्दी करणाºयांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता खाकीला सीसीटीव्हीची साथ मिळणार आहे.
छुप्या मार्गाने व्यवसाय करणाऱ्यांवर करडी नजर
धारणी शहरातील काही व्यावसायिकानी त्यांच्या दुकानाला मागचे दार तयार करून दिवसभर छुप्या मार्गाने व्यवसाय सुरू केला आहे. पोलीस व नगरपंचायत प्राशासनाचे कर्मचारी बाजूला सरले की, त्यांचे ठरलेले गिऱ्हांईक फोनवर माहिती घेऊन मागच्या दरवाजाने प्रवेश करून दुकानातील साहित्य खरेदी करून जातात. त्यासह गुटखा, दारू, मटण यांचीसुद्धा जोरदार विक्री शहरात सुरू आहे. त्यावर आता सीसीटीव्हीची नजर राहील. संचारबंदीत कोण बाहर निघतो, ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसेल. त्या फुटेजची पाहणी करून नगर पंचायत व पोलीस विभाग संबंधितांवर कारवाई करणार आहेत.
संचारबंदी दरम्यान नागरिक अकारण फिरत आहेत. गर्दी करीत आहेत. त्यामुळे नगरपंचायत व पोलीस प्रशासनाला मदतीचा हात म्हणून भाडेतत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी तत्त्वांवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.
-सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी