लॉकडाऊन इफेक्ट; हवेची गुणवत्ता सुधारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:00 AM2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:01:08+5:30
सद्यस्थितीत शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे पुन्हा सुरू झाल्याने आरएसपीएम (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर) मध्ये काही प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी भविष्यात ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण पुन्हा कमी होणार असल्याची बाब अहवालात नमूद केली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय व प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आकडेवारी प्राप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षीच्या तुलनेत यंदा रहिवासी, औद्योगिक व वाणिज्यिक क्षेत्रात प्रदूषणाचे पातळीत घट झाली आहे. एनओएक्स, एसओटू व आरएसपीएमच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याने महापालिका क्षेत्रात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याची बाब ‘एएक्यूएम’ (अॅम्बीएंन्ट एअर क्वालिटी मॉनिटरिंग) च्या आकडेवारी व अहवालाअंती स्पष्ट झाले आहे. यंदा चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा हा परिणाम आहे. याविषयीचा अहवाल महापालिकेला सादर झालेला आहे.
सद्यस्थितीत शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे पुन्हा सुरू झाल्याने आरएसपीएम (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर) मध्ये काही प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी भविष्यात ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण पुन्हा कमी होणार असल्याची बाब अहवालात नमूद केली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय व प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आकडेवारी प्राप्त केली. त्याअनुषंगाने हा अहवाल तयार करून सभागृहासमोर ठेवण्यात आला होता.
एएक्यूएमच्या वार्षिक वायुप्रदूषण अहवालानुसार, रहिवासी क्षेत्रात एनओएक्सचे प्रमाण १३.०५ व एसओटूचे ११.१८ आढळले. हे प्रमाण प्रदूषण पातळी ८० पेक्षा कमी आहे व आरएसपीएमचे प्रमाण ६९.६४ आढळले. हे प्रमाण अनुज्ञेय पातळी १०० पेक्षा कमी आढळले आहे. सन २०१८-१९ मध्ये हे प्रमाण ७४.७१ होते. औद्योगिक क्षेत्रात एनओएक्सचे प्रमाण १३.८३ व एसओटूचे प्रमाण १२.२८ आढळले. प्रदूषण पातळीपेक्षा हे प्रमाण कमी आहे. आरएसपीएमचे प्रमाण ८५.८३ आढळले हे अनुज्ञेय पातळीपेक्षा जास्त असले तरी गतवर्षी हे प्रमाण १०८.९१ होते. व्यापारी क्षेत्रात एनओएक्सचे प्रमाण १४.७१ व एसओटूचे प्रमाण १३.४१ ऐवढे आहे. हे प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे.आरएसपीएमचे प्रमाण ९३.३० आहे, हे अनुज्ञेय प्रमाणापेक्षा जास्त असले तरी गतवर्षी असलेल्या ११८.७६ पेक्षा कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कारवाईचे अधिकार पोलिसांना
शहरातील ध्वनिप्रदूषणासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास कारवाईचे अधिकार पोलीस विभागाला आहेत. शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालये अशी ५८१ शांतता क्षेत्रे घोषित केल्याची माहिती महापालिकेचे पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी दिली.
महापालिका क्षेत्रात वार्षिक वायुप्रदूषण स्थिती
रहिवासी क्षेत्रात आरएसपीएमचे प्रमाण सरासरी ६५.५० म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी तसेच एनओएक्स १२.७० व एसओटूचे प्रमाण १२.१५ म्हणजेच अनुज्ञेय प्रमाण ८० पेक्षा कमी आहे.
औद्योगिक क्षेत्रात आरएसपीएमचे प्रमाण ८७.६० म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी तसेच एबओएक्स १२.४० व एसओटूचे प्रमाण १२.६८ हे अनुज्ञेय पातळी ८० पेक्षा कमी आहे.
व्यापारी क्षेत्रात आरएसपीएमचे प्रमाण ८९.१५ म्हणजे अनुज्ञेय पातळीपेक्षा जास्त तसेच एनओएक्स ११.९० व एसओटूचे प्रमाण १२.०५ ही अनुज्ञेय पातळी ८० पेक्षा कमी आहे.
घनकचरा अन् सांडपाणी व्यवस्थापन
सुकळी कंपोस्ट डेपो, अकोली बायपास व कोंडेश्वर मार्गावर बडनेरा येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला. यासाठी ३८ कोटींचा निधी अपेक्षित आहे. शहरातील दैंनदिन घनकचऱ्यावर येथे विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे.