लॉकडाऊनमुळे घरकुलाची कामे अर्धवट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:17+5:302021-05-14T04:13:17+5:30
अमरावती : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करीत संचारबंदी लागू केली. त्याचा थेट परिणाम घर बांधकामावर ...
अमरावती : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करीत संचारबंदी लागू केली. त्याचा थेट परिणाम घर बांधकामावर झाला आहे. बांधकाम साहित्य मिळेना, कामगारही घरी थांबून असल्याने घरबांधणीचे काम थांबले आहे. त्यामुळे नवीन घर बांधण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागरिक काहीसे अडचणीत आले आहेत.
लॉकडाऊन आणि संचारबंदीचा थेट परिणाम घर बांधणीच्या कामात झाला आहे. संचारबंदीनंतर घरबांधकाम करणारे कामगार घरातून बाहेर पडणे थांबले आहे. तसेच वाहतूक बंदी असल्याने वाळू ,सिमेंट आणि बांधकाम साहित्य मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे घरबांधणीचे काम पूर्णत: ठप्प झाले आहे. अनेकांनी मार्च-एप्रिल महिन्यांपूर्वी घर बांधण्याचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला गती दिली होती. घरबांधणीचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना बांधकाम साहित्य मिळत नाही. कामगार कामावर येत नाहीत. त्यामुळे करायचे काय असे प्रश्नचिन्ह घरमालकांसमोर आहे. जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे नवीन घर बांधणारे नागरिक मार्च महिन्याच्या अगोदरच घरबांधणीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. बांधकामाला पाण्याची कमतरता भासू नये हा त्या पाठीमागे उद्देश असतो. मात्र, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने घरबांधणीचे काम थांबविण्याची वेळ आली आहे. संचारबंदीची मुदत आता १५ मेपर्यंत असली तरी यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घरबांधणीसाठी विविध अडचणींचा सामना काही दिवस करावा लागणार आहे.