‘लॉकडाऊन’ने बिघडविले हस्ताक्षर अन्‌ लिहिण्याची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:13 AM2021-04-01T04:13:54+5:302021-04-01T04:13:54+5:30

शाळा बंद असल्याने सराव थांबला, ग्रामीण मुलांच्या घरात बैठक व्यवस्था नाही अमरावती : कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणातून ...

Lockdown impairs handwriting speed | ‘लॉकडाऊन’ने बिघडविले हस्ताक्षर अन्‌ लिहिण्याची गती

‘लॉकडाऊन’ने बिघडविले हस्ताक्षर अन्‌ लिहिण्याची गती

Next

शाळा बंद असल्याने सराव थांबला, ग्रामीण मुलांच्या घरात बैठक व्यवस्था नाही

अमरावती : कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणातून ज्ञानाचे कण वेचून घेतले. मात्र, महत्प्रयासाने मिळविलेला हा माहितीचा खजिना आता परीक्षेत लिहून काढताना विद्यार्थ्यांची त्रेधा उडण्याची शक्यता आहे. कारण वर्षभर प्रत्यक्ष शाळेत बसण्याची आणि लिहिण्याची सवय लॉकडाऊनमुळे सुटली आहे. कोरोनाच्या संकटाने इतर अनेक हानीसोबतच विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडविण्याचेही वाईट काम केले आहे.

दरवर्षी प्रत्यक्ष शाळेत बसून शिकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय लागत होती. शाळेतील बाकावर कसे बसावे, हे सांगितले जात होते. शिवाय विद्यार्थ्यांचे वय आणि उंची लक्षात घेऊनच सुंदर हस्ताक्षर निघण्यासाठी मदत होत होती. मात्र, यावर्षी कोरोनामुळे शाळाच बंद आहे. यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी या पद्धतीत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा भर केवळ सांगणे आणि ऐकणे या दोनच गोष्टीवर राहिला. विद्यार्थी काय आणि कसे लिहित आहेत, हे पाहण्यासाठी शिक्षकांना वाव नव्हता. शिवाय घरातील सोईनुसार आसनव्यवस्था असल्याने हस्ताक्षरांसाठी अनुरूप जागाही मिळत नव्हती. शाळेतील तासिकेप्रमाणे घरातील ऑनलाईन अभ्यासात वेळेचे बंधन नव्हते. त्यामुळे ऐकलेला अभ्यास विद्यार्थी आपल्या सवडीनुसार हवा तेवढा वेळ घेऊ शकत होते. मात्र, त्यांचे हस्ताक्षर तपासणारे कुणीच नव्हते. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडण्यासोबतच लिहिण्याची गतीही मंदावली आहे. त्यामुळे येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा वेळेत लिहिणे शक्य न झाल्यामुळे अपयश पदरी पडण्याची भीती आहे. त्यामुळे सराव वाढविला जात आहे.

--------------------------

विद्यार्थ्यांनो हे करा!

१) लिखाणाचा सराव करण्यासाठी येणाऱ्या परीक्षेपूर्वी घरात घड्याळ लावून पेपर सोडवून पाहा. हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करून पहा.

२) प्रश्नपत्रिका सोडविताना किंवा कोणतेही लिखाण करताना आपल्या शारीरिक उंचीनुसार योग्य टेबल आणि खुर्चीचा वापर करावा.

३) दरदिवशी किमान आठ ते दहा पाने मजकूर लिहिण्याचा नियमित सराव करावा. परीक्षेत खात्री असलेल्या प्रश्नांची उत्तरे आधी लिहून काढावी.

-----------------

(फोटो घेणे)

‘‘ ऑनलाईन शिक्षणात हस्ताक्षराकडे लक्ष देण्यासाठी वाव नाही. व्याकरणाचे नियम शिकवू शकलो नाही. प्रत्यक्ष अध्यापनताच ते शक्य आहे. मुले अनुकरणातून लेखन शिकतात.

- सुरेश माेलके, मराठी शिक्षक

------

‘‘ मागील वर्षी अनेक शाळांमध्ये हस्ताक्षर उपक्रम राबविला. मात्र, यंदा शाळाच बंद असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहाेचता आले नाही. येत्या काळात कटाक्षाने प्रयत्न करू.

- प्रमोद गारोडे, सदस्य, मराठी भाषा संवर्धन समिती

----------------

जाणकार पालकांचे मत

‘‘ यंदा शाळा नसली तरी आम्ही पालकांनी व्हॉट्स‌ॲप ग्रुप करून विद्यार्थ्यांना अक्षर ओळख होईल, या दृष्टीने प्रयत्न केला.

- संध्या खांडेकर, बडनेरा.

--------------

ऑनलाईनमध्ये हस्ताक्षरावर लक्ष देणे शक्यच नाही. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना परीक्षेत होणार आहे, शिक्षणातही सातत्य नव्हते.

- माया बांबोडे, अमरावती

Web Title: Lockdown impairs handwriting speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.