लॉकडाऊन रिॲलिटी चेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:14 AM2021-02-24T04:14:50+5:302021-02-24T04:14:50+5:30
नागपूर, परतवाडा, वरूड आणि चांदूर बाजारकडे ये-जा करण्यासाठी याच पंचवटी चौकातून जावे लागते. मंगळवारी येथे वाहतूक सिग्नल बंद होते. ...
नागपूर, परतवाडा, वरूड आणि चांदूर बाजारकडे ये-जा करण्यासाठी याच पंचवटी चौकातून जावे लागते. मंगळवारी येथे वाहतूक सिग्नल बंद होते. कर्तव्यावरील पोलीस, राज्य राखीव दलाचे कर्मचारी कार, दुचाकीचालकांना रोखत नव्हते. त्याचा फायदा घेत वाहनचालक विरुद्ध दिशेने बिनधास्त वाहन नेत होते. पोलीस रस्त्यालगत झाडाच्या सावलीचा आश्रय घेत मोबाईलवर मग्न होते. कोण येत आहे आणि कोण जात आहे, याच्याशी काहीही घेणेदेणे नसल्याची त्यांची शैली होती. नजीकच्या पेट्रोल पंपाहून इंधन भरल्यानंतर रॉंग साईड येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईसाठी झाडाची सावली सोडून कुणीही पुढे आले नाही.
--------------------------
शेगाव नाका : वेळ सकाळी ११ वाजून ४० मिनिटे.
हाकेच्या अंतरावर गाडगेनगर पोलीस ठाणे. वाहनांची तपासणी करण्यासाठी रस्त्यावर बॅरिकेड. शेगाव नाक्यावरील ही स्थिती लॉकडाऊनचे गांभीर्य दर्शविणारी. पण, अंमलबजावणी करणारे पोलीस विलासनगरकडे जाणाऱ्या मार्गावर उभ्या एक ऑटोरिक्षात बसून होते. वाहतूक सिग्नल बंद असल्याने पोलिसांना बाय देत वाहने भुर्रकन पुढे निघत होती. दुचाकी वाहनांची झालेली गर्दी कोरोना वाढीस पोषक अशीच होती. कठोरा नाका येथून येणाऱ्या ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेले जात होते. या वर्दळीच्या चौकात एकमेव महिला कर्मचारी कर्तव्यावर होती. ती सर्व प्रकार निमूटपणे बघत होती. चौकात भाजीपाला विक्रेते दिलेल्या मुदतीनंतरही दुकान मांडून होते.
---------------------
इतवारा बाजार मार्ग : वेळ दुपारी १२ वाजून ५ मिनिटे.
जीवनावश्यक वस्तूची मुख्य बाजारपेठ याच मार्गावर आहे. भाजीपाला ते किराणा हे सर्व काही याच भागात मिळते. मंगळवारी लॉकडाऊनमध्येही येथील गर्दी इतर दिवसांप्रमाणे होती. ही गर्दी मुख्य मार्गावर तुरळक, मात्र इतवारा बाजार, सक्करसाथ, वलगाव मार्गावरील गल्लीबोळांमध्ये कायम होती. फळे, भाजीपाला विक्रेत्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी काठ्यांचा आधार घेतला. पांगलेली गर्दी वाहनाने जात असताना, मुख्य मार्गावर तैनात पोलीस, एसआरपीएफ जवानांनी थांबवून कोणाचीही तपासणी केली नाही. शहराच्या या परिसराला लॉकडाऊनमधून सूट मिळाली आहे, अशा पद्धतीने वाहनचालक ये-जा करताना दिसून आले.