आजपासून आठवडाभर लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:19 AM2021-02-23T04:19:05+5:302021-02-23T04:19:05+5:30
अमरावती : कोरोनाग्रस्तांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचा वाढता आलेख बघता, कोरोना नियंत्रणासाठी आता २२ फेब्रुवारीला रात्री ८ पासून तब्बल ...
अमरावती : कोरोनाग्रस्तांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचा वाढता आलेख बघता, कोरोना नियंत्रणासाठी आता २२ फेब्रुवारीला रात्री ८ पासून तब्बल आठवडाभर अमरावती महापालिका व अचलपूर नगर परिषद हद्दीत पुन्हा लॉकडाऊन सुरू होत असल्याची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे केली. मात्र, लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन वर्षात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत संक्रमितांची नोंद २९ हजार ३५७ झाली असून, ४६३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसरीकडे नागरिक त्रिसूत्रीचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी आता २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ पासून, तर १ मार्च रोजी सकाळी ६ पर्यंत लॉकडाऊन कायम राहील, असे पालकमंत्र्यांनी घोषित केले. अमरावती महापलिका व अचलपूर नगर परिषद हद्दीत लॉकडाऊन असेल. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा, औषधी दुकाने, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील. यापूर्वी अमरावती महापलिका व अचलपूर नगर परिषद हद्दीत एमआयडीसीत ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याची परवानगी दिली, ते सर्व उद्योगधंदे सुरू असतील.
आठवड्याचे लॉकडाऊन घोषित झाले असून, नागरिकांनी कोरोना नियमावलींचे पालन न केल्यास लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ होण्याचे संकेत पालकमंत्री ठाकूर यांनी दिले. पत्रपरिषदेला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी अमाेल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे आदी उपस्थित होते.
---------------------------------
- अमरावती महापालिका, अचलपूर नगर परिषद हद्दीतील सर्व प्रकारचे आठवडी बाजार बंद
- उपाहारगृहे, हॉटेलमध्ये पार्सल सुविधा
- शैक्षणिक कार्यालयातील संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल घोषित कामास परवानगी
- मालवाहतूक करण्यास परवानगी
- पोलीस अधिकारी, तहसीलदार देतील बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील प्रवासाची परवानगी
- खासगी वाहतुकीला अतिआवश्यक कामांसाठी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक
- ठोक भाजी मंडई पहाटे ३ ते ६ या वेळेत
- अमरावती महापालिका, अचलपूर नगर परिषद हद्दीत शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी बंद
- लॉकडाऊनच्या काळात शासकीय, जेईई प्रवेश परीक्षा तत्सम परीक्षांच्या ठिकाणांना परवानगी
- चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने, प्रेक्षकगृहे बंद
- सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रमांना मनाई
- प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद
----------------------------------------